पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच पोहरादेवी येणार
मानोरा (Pohradevi Banjara Virasat) : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’ (Banjara Virasat) नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होत आहे. या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच पोहरादेवीत येत असल्याने या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल समाजबांधवांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.
या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar), कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ – वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, मंत्रिमंडळातील मान्यवर मंत्री, खासदार, आमदार , विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी, समाजातील महंत आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सकाळी १० वाजता विशेष हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. येथे पोहोचल्यानंतर ते जगदंबा मंदिर, संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामरावबापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतील. त्यानंतर बंजारा विरासत नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. या (Banjara Virasat) कार्यक्रमानंतर येथे आयोजित मुख्य सभेत जनतेला संबोधित करतील.
बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. देशभरातील १० कोटी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी, धर्मगुरू रामरावबापू महाराजांची समाधी आणि आई जगदंबेचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे (Banjara Virasat) बंजारा येणाऱ्या प्रत्येकास देशभरातील बंजारा समाजाचे संपूर्ण दर्शन व्हावे या दृष्टीकोनातून लोकनेते, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ – वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नाने पोहरादेवी विकास आराखड्यांतर्गत येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृती दर्शविणारे पाच मजली असे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय साकारण्यात आले आहे. २०१८ मध्ये या वास्तुसंग्रहालायाचे भूमिपूजन झाले होते. आज जागतिक दर्जाचे असे हे संग्रहालय तयार झाले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी ९ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन बंजारा समन्वय समितीने केले आहे.
जागतिक दर्जाचे वास्तुसंग्रहालय
१६ एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक वास्तुकलेचा मेळ घालून उभारलेले नंगारा वास्तू संग्रहालय पाच मजली आहे. त्यात १३ विविध गॅलरी असून येथे बंजारा समाजाचा इतिहास, परंपरा, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. याशिवाय फ्लाईंग थिएटर, मुव्हिंग प्लॅटफॉर्म, रमलिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. विविध सात भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास प्रेक्षकांना समजून घेता येणार आहे. नंगारावर भव्य अशी १६० फूट बाय ३० फूट एलईडी स्क्रीन लावण्यात आली असून अर्धा किमी अंतरावरूनही स्क्रीनवरील दृश्य बघाता येणार आहे. १५० फूट उंच सेवाध्वज, संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. येथे दररोज सायंकाळी ७ वाजतापासून लेझरसहित लाईट आणि साऊंड शो होणार आहे. हे (Banjara Virasat) संग्रहालय बघायला जवळपास ९० मिनिटे लागतात. उत्कृष्ट वास्तुकलेचा नमूना असलेले हे देशातील एकमेव असे आगळे वेगळे संग्रहालय आहे. हे संग्रहालय बघताना प्रेक्षकांना वेगळी अनुभूती मिळणार आहे. शनिवारी ५ ऑक्टोबरला (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा वास्तुसंग्रहालयाचे लोकार्पण झाल्यानंतर त्याच दिवशी दुपारी २ वाजतापासून निमंत्रितांना हे संग्रहालय बघण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे.