परभणी(Parbhani) :- शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी साचलेले कचर्याचे ढिगारे यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात तक्रारी आल्यानंतरही मनपा आयुक्त (Municipal Commissioner) तृप्ती सांडभोर दखल घेत नाहीत. त्यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी मंगळवार ३० जुलै रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांची भेट घेऊन केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
परभणी महापालिकेवर प्रशासक तथा आयुक्त म्हणून तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती झाल्यापासून सातत्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा वीज बिल भरले नसल्यामुळे पाणी पुरवठा (Water supply) खंडित होत आहे. काही दिवसापूर्वी सफाई कामगार व घंटागाडी चालकांनी वेतनासाठी संप पुकारला होता. त्यामुळे पंधरा दिवस घंटागाड्या बंद राहिल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे साचले होते. विविध नागरी समस्या संदर्भात वारंवार निवेदने दिले, आंदोलने केली. परंतू मनपा आयुक्तांच्या कामात सुधारणा झाली नाही. त्यामुळे वादग्रस्त आयुक्तांची खातेनिहाय चौकशी त्यांचे निलंबन करावे अशी मागणी आ.डॉ.पाटील यांनी करुन जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला. आता यावर मुख्यमंत्री (Chief Minister) कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण परभणीकरांचे लक्ष लागले आहे.