मागील 9 वर्षात पहिल्यांदाच गावकऱ्यांना मासिक सभेत प्रवेश!
कोरची (Korchi Nagar Panchayat) : कोरची नगरपंचायत मध्ये जो सावळागोंधळ आहे, त्याविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत. रस्ते, नालीची सफाई, आरोग्य, वीज, पिण्याचे पाणी ईत्यादी समस्या घेऊन मागील एक महिन्यापासून नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात कोरचीत आंदोलन सुरू आहे. अशातच 30 सप्टेंबर ला नगरपंचायत ची मासिक सर्वसाधारण सभा आहे, याची माहिती मिळाली. या सभेत सामान्य नागरिक (Citizens) उपस्थित राहू शकतात किंवा नाही याबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार होते. परंतु आंदोलन करणाऱ्यांची याची माहिती काढली आणि सभेला उपस्थित राहण्याबाबत एक दिवस आधी नगरपंचायत ला कळविले.
बऱ्याच समस्या यावेळी उपस्थित करण्यात आल्या!
बऱ्याच वार्डातील लोकांनी आपापल्या समस्या घेऊन सभेत आले होते. यात प्रामुख्याने दर्रो दर्रोटोली मध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या गोटूलचे आदिवासी समाजाला हस्तांतरण करण्यात यावे, वार्ड क्रमांक 11 मध्ये रस्ता तयार करून देणे, अशा बऱ्याच समस्या यावेळी उपस्थित करण्यात आल्या. या सभेत मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या कामाविषयी अभियंता नाकाडे यांना लोकांनी जाब विचारला. कोणत्याही प्रकारचा बेस तयार न करता बांधण्यात आलेला सिमेंट काँक्रिट चा रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे. त्यापेक्षा त्या रस्त्याची गरज नसताना, त्या ठिकाणी रस्ता बांधण्यात आलेला आहे. या रस्त्याची निधी अभियंता आणि ज्यांनी मंजुरी दिली त्यांनी द्यावे. नगरपंचायत मधील निधी या कामासाठी वापरता येणार नाही. असे लोक बोलताच अभियंता नाकाडे यांनी लोकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, लोक आपल्या मुद्यावर ठाम होते. हा प्रश्न निवळला नाही. अशाप्रकारचे बऱ्याच विषयावर वादळी चर्चा झाली. या सभेत नगरसेवकांव्यतिरिक्त 40-45 लोक उपस्थित होते.या सभेत निवडून आलेले फक्त 10 नगरसेवक व अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते. 5 नगरसेवक गैरहजर होते. विकास करण्यास उदासीन असलेल्या नगरपंचायत कडे 5 नगरसेवकांनी (Councilor) पाठ फिरवली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी गणेश सोनवानी यांनीही दांडी मारली. याबाबत माहिती घेतली असता, मुख्याधिकारी मिटींगला बाहेर गेले असल्याचे कळले.