चाकूरकरांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्यांनी ‘वात’ पेटविल्याची चर्चा
– महादेव कुंभार
लातूर (Latur Assembly Elections) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये अंतर्गत संघर्षाने टोकाचे शिखर गाठले असून या अंतर्गत संघर्षाची वात नेमकी कोणी पेटविली हा संशोधनाचा विषय झाला आहे. (Latur Assembly Elections) भाजपामध्ये चाकूरकरांना दाखल करून घेण्यासाठी ज्या नेत्यांचा विरोध होता, त्याच नेत्यांनी या संघर्षाची वात पेटविली, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
लातूर जिल्ह्यात लातूर, औसा व निलंगा येथे भाजपाचे सत्ता केंद्र आहे. अहमदपूर व उदगीर येथील भाजपा सत्ता केंद्राची गेल्या (Latur Assembly Elections) विधानसभा निवडणुकीत विल्हेवाट लावल्यानंतर या तीन सत्ता केंद्रांमध्ये जिल्ह्यातील भाजपा विभागली गेली. त्यातच लातूर जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे? या मूळ प्रश्नावर खल झाल्याने व त्याची उकल न निघाल्याने गेली पाच वर्षे लातूर जिल्ह्याला भाजपाने मंत्रीपदापासून दूर ठेवत लातूरच्या स्थानिक नेत्यांना जमिनीवर आणले. आपणच जिल्ह्यात भाजपाची सत्ता आणली, असा राणा भीमदेवी थाटातील घोष करणारे नेते गेली पाच वर्षे साक्षात् ‘देवेंद्रा’शी कसे तोंड द्यावे, याच विचारात गारद झाले. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी संधान साधून सुधाकर शृंगारे यांचा खासदारकीचा पुरा शृंगारही उतरविला.
इतके सारे झाल्यानंतर भाजपामध्ये लातूरच्या नेत्यांना प्रवेशास मुळात विरोध असलेल्या काही नेत्यांनी दिखाव्यापुरतीच हजेरी लावली. मात्र आता विधानसभा निवडणुकीत मूळचे आणि बाहेरुन आलेले, अशा वादाचा सुरुंग पेटविला गेला आहे. (Latur Assembly Elections) लातूरमधल्या निष्ठावंत भाजपाईंनी मुंबई गाठत ‘बाहेरुन आलेल्यां’ना विधानसभेची उमेदवारी देवूच नये, यासाठी शिकस्त चालविली आहे तर दुसरीकडे लातूर ग्रामीणमध्ये कव्हेकर व कराड गटात ‘घमासान’ सुरू आहे. हे कमी होते की काय, म्हणत उदगीरमध्ये काही प्रवासी भाजपाईच्या शंभरावर गाड्या प्रदेशाध्यक्षांपुढे हजर करण्यात आल्या. आता तेही स्वत:ला निष्ठावान म्हणत महायुतीतील मित्रपक्षाच्या मंत्र्याविरोधात दंड थोपटत आहेत. त्यामुळे निलंगा आणि औशात अजित पवारांचे पट्ठे काय भूमिका घेतात, हे तितकेच महत्त्वाचे आहे. तूर्तास उदगीरहून गेलेल्या गाड्यांना ‘डिझेल कुणाचे?’ याची गंमतीशीर चर्चा होत आहे.
‘आदमी सही है, लेकीन पार्टी गलत…’
लोकसभा निवडणुकीतला एक किस्सा आहे. काँग्रेसकडून शिवराज पाटील निवडणूक (Latur Assembly Elections) लढवत होते तर भाजपाकडून गोपाळराव पाटील लढत होते. भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयींची त्यावेळी सभा झाली. त्या सभेत चाकूरकरांविषयी वाजपेयी एवढच म्हणाले, आदमी सही है, लेकीन पार्टी गलत…’ याच वाक्यावर लातूरमध्ये चाकूरकरांचा विजय सोपा झाला. आता त्याच चाकूरकरांच्या सूनबाईंनी दुरुस्ती केली आणि भाजपात प्रवेश केला. मात्र भाजपातील काही मंडळींनी त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध चालविला आहे. यामुळे या निष्ठावानांचे ‘मार्गदर्शक’ कोण? ‘काँग्रेस बरोबर ‘सेटिंग’ कोण बरे करत आले आहे, हेच यातून स्पष्ट होत आहे.