निटूर (Latur) :- गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली निटूरची पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरु करावी. तसेच पाईपलाईन बोलताना नादुरुस्त झालेले रस्ते तात्काळ दुरुस्त करावे, या व इतर मागणीसाठी गुरुवारी निटूरच्या सरपंच व ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदोलन केले. येत्या तीन एप्रिलपर्यंत जर पाणी पुरवठा (Water supply) सुरु नाही झाला तर रास्ता रोको व गाव बंद आंदोलन करण्याचा लेखी इशाराही यावेळी देण्यात आला. सलग दोन तास झालेल्या या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सलग दोन तास झालेल्या या आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी
निटूर ता. निलंगा येथे सर्वाना घराघरात शुद्ध पाणी मिळावे या हेतूने केंद्र सरकारने (Central Govt) तीन वर्षांपूर्वी १० कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली खरी, मात्र गेल्या तीन वर्षापासून ही योजना संबंधित कंत्राटदार (contractor) व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे कार्यान्वित झाली नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होतं आहेत. दरम्यान या संदर्भात निटूर ग्रामपंचायतने अनेक वेळा महाराष्ट जीवन प्राधिकरण कार्यालयाला पाणीपुरवठा योजना पूर्ण करावी, असा लेखी पत्रव्यवहार केला. परंतु संबंधित कार्यालयाने कसलीच दखल घेतली नाही. त्यामुळे आज निटूरच्या सरपंच प्रतिभा अनिल सोमवंशी यांच्या नेत्रत्वाखाली ग्रामस्थानी भर उन्हात दोन तास आंदोलन केले. निटूर व निटूर मोड येथे पाईपलाईनच्या नावाखाली गावातील अनेक रस्ते उकरण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर सहज चालणे मुश्किल झाले आहे.
पाईप लाईन बुजवल्या नंतर त्यावर पॅच वर्क ही केले नाही त्यामुळे तीन वर्ष्यापासून नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या तुघलकी कारभारा विरोधात आज सकाळी सरपंच प्रतिभा अनिल सोमवंशी. तसेच शिवराज सोमवंशी, ग्रामपंचायत सदस्य. संदीप पाटील, दिनकर कवडे, श्रावण शिंदे, शिवाजी बाबर, शिवाजी व्यवहारे .राजू चव्हाण, बालाजी मगर, यूसूब सेख, पवन शिंदे, दत्ता पाटील, विजय देशमुख, तसेच महिला ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रशासनाचा निषेध म्हणून शोले स्टाईल आंदोलन केले. यावेळी महिला उषा ऊपळे, शिवनंदा व्यवहारे, मनिषा शिंदे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.