माजी जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश
यवतमाळ (NCP Ajit Pawar) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका राष्ट्रवादीसाठी महत्वाच्या आहेत. त्यामुळे विजयी होण्याची क्षमता असणार्यांना उमेदवारी देवून स्थानिक स्वराज्य संस्थेत यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कामाला लागण्याचे निर्देश पक्ष प्रमुख अजितदादा पवार यांनी आज समता मैदान येथील आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले. यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार माजी जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह त्यांच्या समर्थक शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष प्रमुख अजितदादा पवार (NCP Ajit Pawar) यांच्या हस्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला.
यावेळी बोलताना दादा म्हणाले की प्रवीण देशमुख अनुभवी आहेत, त्यांनी जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच पक्ष संघटनेमध्ये महत्वाच्या पदावरील जबाबदार्या सांभाळलेल्या आहेत.आपल्या विचारांचा वारसा घेऊन चालणारे आहेत, त्यांची टीम चांगली आहे,सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालणारे आहेत.पक्षाच्या विचारांशी जुळणारे आहेत, त्यांनी आज आपल्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून उद्याचे आमदार,खासदार,मंत्री मुख्यमंत्री घडणार आहे,त्यामुळे ह्या निवडणुका गंभीरतेने घ्या,नवे-जुने असा वाद घालत बसू नका. कुणाचा अपमान करू नका,सर्वांना आदर द्या,अपशब्दाचा वापर करू नका,कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो,त्यांच्या पाठीशी उभे रहा.कार्यकर्त्यांमुळे आपण आहोत,याचा विसर पडू न देण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दिल्या.
यावेळी मंचावर राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, आ.संजय खोडके, आ. अमोल मिटकरी, मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख, क्रांती राऊत, नाना गाडबैले, लालजी राउत,विवेक देशमुख व इतर उपस्थित होते.

ना. इंद्रनिल नाईक यांचे भरसभेत टोचले कान
राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी काम करण्याचे निर्देश अजित पवार (NCP Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणातून राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांना दिले. त्यावेळी त्यांनी आपल्याकडे स्व.वसंतराव नाईक,स्व.सुधाकरराव नाईक यांचा वारसा आहे. आपल्याकडे वयही आहे,तेव्हा पक्षासाठी काम करा,पक्ष संघटन मजबूत करण्याच्या आदेश वजा सुचना देत दादांनी भरसभेत ना.नाईक यांचे कान टोचले.

घरी परत येण्याची संधी दादांनी दिली : प्रवीण देशमुख
राष्ट्रवादीत असताना आपल्याला पक्षाने भरपूर दिले मात्र काही कारणास्तव नाईलाजाने राष्ट्रवादी सोडावी लागली,याची खंत आजही आहे पण दिलगीर आहोत. दादांनी आज घरी परतण्याची संधी आम्हाला दिली,त्यांच्या हस्ते आमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला आहे,दादांचे आम्ही आभारी आहोत. आज (NCP Ajit Pawar) दादांकडे मी माझ्यासाठी काही मागणार नाही.
मात्र जिल्ह्यात शेतकर्यांची परिस्थिती वाईट आहे,त्यांना दादांनी मदतीचा हात दयावा, पानंद रस्ते मंजूर आहेत,पण निधी अभावी कामे रखडली आहेत, बेंबळा प्रकल्पाच्या उपवितरीकांना सिमेंट लायनिंग करण्यासाठी निधी उपलब्ध करून दयावा,अमृत पाणी पुरवठा योजना फेल गेली आहे,ती कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा,अशा जनहिताच्या मागण्या देशमुखांनी दादांपुढे मांडल्या. दादांनी त्यांच्या भाषणातून देशमुखांनी मांडलेल्या प्रत्येक मागणीवर सविस्तर उत्तर देत सहमती दर्शविली.




