३५ हजार कोटींचा प्रस्तावित प्रकल्प; माळशेज घाटात ८ किमी बोगदा, कल्याण ते लातूर प्रवास चार तासांत होण्याची शक्यता
मुंबई महानगर प्रदेशाला थेट मराठवाड्याशी जोडणाऱ्या कल्याण–लातूर जनकल्याण एक्सप्रेसवे प्रकल्पाला राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे. सुमारे ४४२ किलोमीटर लांबीचा सहापदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी अंदाजे ३५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) या महामार्गाची उभारणी केली जाणार आहे.
सध्या कल्याणहून लातूरपर्यंतचा प्रवास करण्यासाठी सुमारे १० ते ११ तास लागतात. प्रस्तावित एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या चार तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यासह मराठवाड्यातील नागरिकांना मोठा फायदा होण्याबरोबरच उद्योग क्षेत्र आणि मालवाहतुकीलाही गती मिळण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पातील महत्त्वाचा भाग म्हणजे माळशेज घाट परिसरात प्रस्तावित ८ किलोमीटर लांबीचा बोगदा. या बोगद्यामुळे घाटातील वळणावळणाचे रस्ते, चढ-उतार तसेच वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.
१७ इंटरचेंज, अनेक महामार्गांशी जोडणी
कल्याणपासून सुरू होणारा हा एक्सप्रेसवे मुरबाड, माळशेज घाट, ओतूर-आळेफाटा, अहिल्यानगर, पाथर्डी, बीड, मांजरसुंभा आणि अंबाजोगाई मार्गे लातूरपर्यंत जाणार आहे. या मार्गावर एकूण १७ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, या एक्सप्रेसवेची राज्यातील विविध महत्त्वाच्या महामार्ग आणि वाहतूक कॉरिडॉरशी जोडणी करण्याचे नियोजन आहे. दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेच्या विरार–जेएनपीटी लिंक तसेच विरार–अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरशी जोडणी झाल्यास नवी मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि जेएनपीटी बंदरापर्यंतचा संपर्क अधिक सुलभ होऊ शकतो.
लातूरच्या दिशेने या महामार्गाची नागपूर–गोवा शक्तिपीठ एक्सप्रेसवेशी जोडणी प्रस्तावित आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि गोवा या भागांमधील दळणवळण अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.
याशिवाय सूरत–चेन्नई आर्थिक कॉरिडॉरशी जोडणी झाल्यास दक्षिण भारताच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीलाही या मार्गाचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे कल्याण–लातूर एक्सप्रेसवे हा केवळ प्रवासाचा कालावधी कमी करणारा महामार्ग न राहता मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि दक्षिण भारताला जोडणारा महत्त्वाचा आर्थिक कॉरिडॉर ठरण्याची शक्यता आहे.