शहीद हरिदास कापसेंना शेलसूरमध्ये भावपूर्ण मानवंदना
चिखली (Martyr Haridas Kapse) : भारतमातेच्या सेवेसाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणारे शहीद जवान स्व. हरिदास कापसे यांच्या अस्थिकलश शोकसभेस चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी उपस्थित राहून शहीद जवानाच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. अस्थिकलशाचे पूजन करून त्यांनी वीर जवानाला मानवंदना दिली तसेच कापसे परिवाराच्या दुःखात सहभागी होत शोकभावना व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना आमदार श्वेता महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) म्हणाल्या, “हरिदास कापसे यांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्याचा विचार न करता भारतमातेच्या चरणी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाच्या सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशातील कोट्यवधी नागरिकांचे संरक्षण करत असतो. अशा वीर जवानाचे तरुण वयात जाणे ही संपूर्ण समाजासाठी अत्यंत वेदनादायी बाब आहे.”
“एका बाजूला देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारा वीर जवान आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पश्चात राहिलेली पत्नी आणि लहान मुले... या कुटुंबाच्या दुःखाची कल्पनाही करणे कठीण आहे. पतीचे छत्र हरपल्याचे दुःख, वडिलांच्या प्रेमापासून वंचित झालेल्या चिमुकल्यांची पोकळी आणि संपूर्ण आयुष्याची जबाबदारी एकट्याने पेलणाऱ्या पत्नीचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मात्र, कापसे परिवाराने हे दुःख एकट्याने पेलावे लागणार नाही. संपूर्ण समाज आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

त्या (MLA Shweta Mahale Patil) पुढे म्हणाल्या, “हरिदास कापसे (Martyr Haridas Kapse) यांचे बलिदान पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहावे, त्यांच्या शौर्याची आणि देशभक्तीची आठवण सदैव जिवंत राहावी, यासाठी शेलसूर येथे शहीद हरिदास कापसे यांचे स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानाला कायमस्वरूपी आदरांजली अर्पण केली जाईल.”
“देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांमुळे आपण आपल्या घरात सुरक्षितपणे जगतो. त्यामुळे जवानांच्या त्यागाची जाणीव ठेवणे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. शहीद हरिदास कापसे यांचे बलिदान संपूर्ण देश सदैव स्मरणात ठेवेल,” असेही आमदार श्वेता महाले पाटील यांनी सांगितले.
यावेळी वीरपिता मधुकर शंकर कापसे, कर्नल सुहास जतकर, प्रा. डॉ. सदानंद देशमुख,अमोल साठे,अंकुशराव वाघ माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषद, अरविंद बापू देशमुख माजी सभापती पंचायत समिती, रवींद्र काळे, सरपंच विजय धंदर, मेजर सुभेदार रामदास धंदर, अजिंक्य पाटील, राजेंद्र काळे, राजेंद्र रिंढे पोलिस पाटील, गजानन इंगळे माजी पंचायत समिती सदस्य, ज्ञानेश्वर कापसे, सुनील सपकाळ बुलढाणा, शेख सुभान मुख्याध्यापक, पत्रकार श्याम देशमुख, विशाल नेमाने, लक्ष्मण रिंढे, विजय घ्याळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.