शोकाकुल वातावरणात चिखलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चिखली (Martyr Haridas Kapse) : उत्तराखंड येथील अतिउंचावरील (हाय अल्टीट्यूड) अतिशय कठीण भागात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना प्राणवायूची (ऑक्सिजन) पातळी खालावल्याने हृदयविकाराचा तीव्र त्रास होऊन हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांना वीरगती प्राप्त झाली. ते मूळचे चिखली तालुक्यातील शेलसूर येथील रहिवासी असून, सध्या दांडगे लेआऊट, चिखली येथे वास्तव्यास होते. मूळ बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप युनिटचे व सध्या ४११ (स्वतंत्र) पॅरा फिल्ड कंपनी आग्रा येथे ते आपले योगदान देत होते. क्रांतीदिनाच्या पूर्वसंध्येलाच त्यांच्या शहादतीची बातमी धडकताच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर आणि विशेषतः शेलसूर व चिखली परिसरावर शोककळा पसरली.

शहीद हरिदास कापसे यांचे पार्थिव उत्तराखंडहून विमानाने दिल्ली व तेथून छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. तेथून बाय रोड चिखली येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव पोहोचताच उपस्थित जनसमुदायाचा हंबरडा फुटला. चिखली शहरातून जेव्हा शहिदाची अंत्ययात्रा निघाली, तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले हजारो नागरिक अश्रूधारा रोखू शकले नाहीत. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आणि ‘शहीद वीर जवान हरिदास कापसे अमर रहे’ या वीरश्रीपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
त्यानंतर चिखली येथील जिल्हा परिषद मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सैन्य दल आणि महाराष्ट्र पोलिसांच्या तुकडीने हवेत ३-३ फेऱ्या झाडून व सैनिकी मानवंदना देऊन आपल्या लाडक्या वीराला अंतिम सलामी दिली. (Martyr Haridas Kapse) सैन्याधिकाऱ्यांच्या हस्ते जेव्हा शहिदाच्या सन्मानार्थ तिरंगा ध्वज वीरपत्नी वृषाली कापसे, वीरपिता मधुकर कापसे, बंधू ज्ञानेश्वर व ओमप्रकाश, लहानगा मुलगा रुगवेद आणि मुलगी वैदेही यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, तेव्हा उपस्थित सर्वांचेच काळीज पिळवटून निघाले. ३ महिन्यांपूर्वीच मातेचे छत्र हरपल्यानंतर आता कुटुंबाचा मुख्य आधार असलेला वीरपुत्र अचानक सोडून गेल्याने वीरपत्नी आणि नातलगांचा आक्रोश पाहून तिथे हजर असलेल्या प्रत्येक नागरिकाचे आणि अधिकाऱ्यांचे मन भरून आले होते; उपस्थित जनसमुदायाला आपले अश्रू अनावर झाले होते.

याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी भावूक होत, शहीद हरिदास कापसे यांच्या स्मृती सदैव तेवत राहण्यासाठी त्यांच्या मूळ गावी, शेलसूर येथे भव्य स्मारक उभारले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली.
या दुःखाच्या प्रसंगी आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ऋषीभाऊ जाधव, माजी आमदार राहुल बोंद्रे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, उपनगराध्यक्ष वैशाली कपिल खेडेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा सैनिक अधिकारी रूपाली सरोदे, डीवायएसपी संतोष खाडे, उपविभागीय अधिकारी राजेश पाटील, तहसीलदार विजय सवडे, बीडीओ समाधान वाघ, कर्नल सुहास जतकर, ठाणेदार भूषण गावंडे, अमडापूरचे ठाणेदार जयसिंग राजपूत, शेलसूरचे सरपंच सखाराम धंदर, मुख्याधिकारी प्रशांत बिडकर, विजय पाटील आणि पत्रकार गोपाल तुपकर यांच्यासह लष्करी अधिकारी, पोलीस दल, विविध क्षेत्रांतील मान्यवर व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्वच मान्यवरांनी आणि जनसमुदायाने अश्रूभाराने पुष्पचक्र अर्पण करून देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या या वीर योद्धा हरिदास कापसे (Martyr Haridas Kapse) यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.