नीट परीक्षा गोंधळ, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन
कोरपना (Sonam Wangchuk Morcha) : देशभरातील विविध विद्यार्थी प्रश्नांसह लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कोरपना येथे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला.

शहरातील बस स्थानक परिसरात प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या (Sonam Wangchuk Morcha) मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार व गोंधळाची निष्पक्ष चौकशी करावी, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशीही मागणी करण्यात आली.

मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घेऊन देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या मोर्चात काँग्रेस, शेतकरी संघटना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जन सत्याग्रह संघटना आदी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.