शासकीय कामांसाठी कोणी पैशाची मागणी केली तर मला सांगा!
पालकमंत्री सौ. मेघनादिदी (साकोरे) बोर्डीकर
परभणी (Meghanatai Bordikar) : सर्वच योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने एक ही रूपाया कोणाला ही द्यायची गरज नाही असे सांगत शासकीय कामांसाठी कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याने पैशाची मागणी केली तर मला सांगा असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघनादिदी (साकोरे) बोर्डीकर यांनी गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी परभणीतील गंगाखेड शहरातील कापसे मंगल कार्यालयात आयोजीत जनता दरबारात बोलतांना केले.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी परळी रस्त्यावरील कापसे मंगल कार्यालयात आयोजीत जनता दरबारात पालकमंत्री सौ. मेघनादिदी (साकोरे) बोर्डीकर यांनी उपस्थित नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या तेंव्हा पंचायत समिती कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होतं नसल्याची तक्रार करत घरकुल योजनेचे हप्ते, रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे टाकण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांसह सर्वच कर्मचारी पैसे घेत असल्याचे सांगितले असता पालकमंत्री सौ. बोर्डीकर यांनी गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे यांना धारेवर धरत त्यांच्याकडून स्पष्टीकरण घेत नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगर परिषद, तालुका कृषी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, विज वितरण कंपनी कार्यालय आदी कार्यालयात होतं असलेल्या भ्रष्ट कारभाराची जंत्रीच नागरिकांनी पालकमंत्री सौ. मेघनादिदी (साकोरे) बोर्डीकर यांच्या समोर मांडल्याने नागरिकांची कामे करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने पैशाची मागणी करू नये, किंवा त्यांचा पानउतारा न करता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत कामासंदर्भात त्यांना उडवाउडवीची उत्तरे न देता योग्य ते मार्गदर्शन करून समाधान करावे असे सांगत नागरिकांच्या कामासाठी कोणी पैसे घेतल्याची तक्रार प्राप्त झाल्यास हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा पालकमंत्री सौ. मेघनादिदी (साकोरे) बोर्डीकर यांनी दिला. या जनता दरबारात खळी ते मैराळसावंगी रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचा व अर्धवट झाल्याच्या प्रश्नासह मरगळवाडी येथे तहसीलदार यांनी बेकायदेशीर रस्ता दिल्याची तक्रार शेतकऱ्याने केली. कौडगाव येथील पुल व ८ किलोमीटर रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी करण्यात आली. सोलार योजनेचे पैसे भरून ८ ते १० महिने झाले तरी मात्र सोलार मिळाले नाही. चिंचटाकळी येथील शिवरस्ता खुला करावा आदी मागण्यांसह घरकुलासाठी वाळू द्यावी, रस्ते, विज, पाणी, आरोग्य, स्वच्छता, वृक्ष लागवड, शहरात मोकाट फिरणारे वराह आदी विविध विषयावर शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारी तत्काळ सोडविण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रेरणाताई वरपुडकर, डॉ. सुभाष कदम, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, जयश्री मुंडे, श्रीनिवास मुंडे, विठ्ठलराव रबदडे, प्रणित खजे, अभय कुंडगीर, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, डॉ. लखमावार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी मनोजकुमार दिक्षित आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी पैसे मागितले तर बुटाने मारा!
शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे मागितले तर त्याला बुटाने मारा व माझ्याकडे या त्याचे पुढे काय करायचे ते मी पाहतो असे भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी म्हटल्याने उपस्थित अधिकारी आवाक झाले तर त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी मात्र टाळ्यांचा कडकडाट केला.
पालकमंत्री यांच्या वाहनावर फेकली शाई दोघे ताब्यात!
शहरात आयोजीत कार्यकर्ता संवाद मेळाव्यास संबोधित करून पालकमंत्री सौ. मेघनादिदी बोर्डीकर यांचा ताफा जनता दरबार स्थळी निघाला असता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करत इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत कॉ. योगेश फड व दिपक फड यांनी पालकमंत्री यांच्या वाहनावर काळे ऑइल फेकून निषेध केला. या दोघांना ही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




