मेळाव्यात ७ ते १० हजार ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहतील, अशी माहिती!
नांदेड (Senior Citizens) : ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १२ ऑक्टोबर रोजी, रविवारी नांदेड येथील नविन कौठा गुरूद्वारा डेरा (विमान बिल्डींग) येथे ‘लक्षवेधी मागणी महामेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम नांदेड यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त (Senior Citizens Day) हा महत्त्वाचा मेळावा होत आहे. या मेळाव्यात सात ते दहा हजार ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहतील, अशी माहिती उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉमचे विभागीय अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी १० ऑक्टोबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मानधनासह प्रलंबित प्रश्नांबद्दल शासन दरबारी कसलीच दखल घेतली गेली नाही!
पुढे बोलताना डॉ. हंसराज वैद्य म्हणाले केले की, या महामेळाव्यात नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या जिल्ह्यांतील गरीब, गरजवंत, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, निराधार, विधवा माता आणि दिव्यांग ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार आहेत. या दुर्लक्षित आणि त्रस्त नागरिकांच्या कथा आणि व्यथा जाणून घेतल्या जातील. इतकेच नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Government Elections) ज्येष्ठ नागरिकांनी काय भूमिका घ्यावी, याची दिशाही या मेळाव्यात निश्चित केली जाणार आहे. “आजपर्यंत जेष्ठ नागरिकांच्या मागण्यासाठी पंधरा-पंधरा हजार ज्येष्ठ नागरिकांचे अनेक मोर्चे काढले, आंदोलने केली. लोकप्रतिनिधींपासून ते पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदनं दिली, तरीही मानधनासह प्रलंबित प्रश्नांबद्दल शासन दरबारी कसलीच दखल घेतली गेली नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. “हा मेळावा शासनाला केलेली शेवटची विनंती आणि संधी आहे. शासनाने आमच्या संयमाचा अंत पाहू नये आणि आम्हांला बिनकामाचे, टाकाऊ समजू नये,” असा स्पष्ट इशारा डॉ. वैद्य यांनी दिला. त्यांनी यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या अति महत्त्वाच्या ११ मागण्या पत्रकार परिषदेत मांडल्या.
जेष्ठ नागरिकांच्या प्रमुख मागण्या!
गरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमहा पाच हजार रुपये मानधन त्वरित मान्य करून नियमित त्यांच्या खात्यावर जमा करावे, २००७ चा पारित कायदा, २०१० चे नियम आणि २०१३ चे धोरण व कायदा तत्त्वतः अंमलात आणावा, शासकीय योजना (Govt Scheme) व कार्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय ६० वर्षच ग्राह्य धरावे, ‘लाडके ज्येष्ठ माय-बाप योजना’ तात्काळ कार्यान्वित करावी, ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून घोषित करून उचित सन्मान करावा,ज्येष्ठ नागरिक मतदार समूहातून एक महिला व एक पुरुष विधान परिषद व राज्यसभेवर सन्मानाने घेण्याची तरतूद करावी,राज्य मंत्रिमंडळात वेगळ्या ‘ज्येष्ठ नागरिक खात्याच्या मंत्रीपदाची’ निर्मिती करावी,किमान ७०-७५ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण करमुक्त करावे,विधानसभेत ‘ज्येष्ठ नागरिक सुखसोयी सुविधा देण्याबाबद विधेयक २०२५’ (क्र. ७२) वर सखोल चर्चा करून मानधनासह प्रलंबित प्रश्न सोडवावेत,नवनिर्मित ज्येष्ठ नागरिक महामंडळावर केवळ मंत्री, सनदी अधिकारी नव्हे, तर फेस्कॉमच्या प्रत्येक प्रादेशिक विभागातून किमान एक-एक अध्यक्ष नेमून समतोल साधावा अशा एकूण ११ मागण्या सरकारकडे करण्यात आल्या.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहिष्कार टाकू! असा गंभीर इशारा!
डॉ. वैद्य यांनी मुख्यमंत्री महोदयांना आवाहन केले की, येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्यावा. “ज्येष्ठ नागरिकांची मानहानी, पिळवणूक, थट्टा त्वरित थांबवा व मानसन्मान राखा. मरणानंतक अन्न-पाणी त्याग किंवा मतदान बहिष्कारासारखे आंदोलन करण्यास भाग पाडू नका, ज्येष्ठ नागरिकांचा अंत पाहू नका, ‘ज्येष्ठ नागरिक माय-बापातच देव शोधा’ अन्यथा येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बहिष्कार टाकू!” असा गंभीर इशारा देखील डाॅ.हंसराज वैद्य यांनी दिला.
मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या नागरिकांना डॉ. हंसराज वैद्य हे एकमेव मार्गदर्शन!
या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या नागरिकांना डॉ. हंसराज वैद्य (Dr. Hansraj Vaidya) हे एकमेव मार्गदर्शन करतील. मेळाव्यात नवनिर्मित पावती धारक ज्येष्ठ नागरिक संघांचे ‘प्रमाण पत्रं’ वाटपही करण्यात येणार आहे अशी माहिती दिली. या पत्रकार परिषदेला फेसकाॅमचे सचिव प्रभाकर कुंटूरकर,कोषाध्यक्ष गिरीष बऱ्हाळे, पुष्पा कोकीळ यांची प्रमुख उपस्थिती होती.