हिंगोली (Minister Dattatraya Bharane) : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे वाशिमहून नांदेड कडे शनिवारी दुपारच्या सुमारास जात असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनाचा ताफा आणून काळे झेंडे दाखविल्याने बसंबा पोलिसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, कनेरगाव नाका येथे दुर्वांकुर हॉटेल समोर राज्य रस्त्यावर वीस सप्टेंबरला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatraya Bharane) यांचा वाहन ताफा जात असताना अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे वसीम देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अचानक रस्त्यावर येऊन वाहन ताफ्याला काळे झेंडे दाखवून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशा घोषणा दिल्या.
त्यामुळे बासंबा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणात रात्री उशिरा बासंबा पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी मीना सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसीम अहमद फईम अहमद देशमुख राहणार नाईक नगर हिंगोली, दिलशान सिकंदर खान पठाण राहणार नाईक नगर, सय्यद मोईस सय्यद मोईन राहणार मस्तान शहा नगर, जुनेद अहमद फईम अहमद राहणार नाईक नगर, शेख असिफ शेख सरवर राहणार नाईक नगर हिंगोली या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास गजानन बेडगे हे करीत आहेत.