अनंत राऊत व गोपाल मापारी यांचा घडवून आणला दुग्धशर्करा योग!
काव्याच्या चंद्रात रसिकतेचं चांदणं पांघरून गेली, मराठी गझलांची ‘कोजागिरी’
बुलढाणा (Mitrarangan Kojagiri) :
चालताना मध्ये रात आली कधी
मित्र येतो पुढे काजव्यासारखा..
का उगा हिंडतो देव शोधायला
मित्र आहे जवळ मंदिरासारखा..
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा,
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारख्या !
कविवर्य अनंत राऊत यांचे काव्य वनव्यात गारव्यासारखं मैत्रीची पखरण करत असताना,
खाली जळते सरपण ठेवा,
वर देहाचा रांजण ठेवा..
नंतर ठेवा शव सरणावर,
आधी त्यावर ‘मीपण’ ठेवा ?
अशा गोपाल मापारी यांच्या मराठी गझला कार्यक्रमभर पारव्यासारख्या घुमत होत्या.. निमित्त होते मित्रांगण परिवाराच्या “दुधाळ” आयोजनाचे, यातील “शब्दाळ” वातावरणाला रसिकांची “मधाळ” साथ मिळत होती !
मित्रांगण, बुलढाण्यातील कलाप्रेमी मित्रांचा एक समूह. ८/९ वर्षांपूर्वी स्थापन झालेला. दरवर्षी कोजागिरीला हा समूह मराठीत गझलांचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. त्यामुळे बुलढाण्यातील कोजागिरी म्हटले की, मराठी गझलांची मेजवानी अन त्याला दर्दी रसिकांची उपस्थिती.. हे जणू समीकरणच बनलेलं. यावर्षी अनंत राऊत व गोपाल मापारी या दोन कवीमित्रांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यांनीही अगदी ‘शिग’ येईपर्यंत वेगवेगळ्या काव्य आणि गझल सादर केल्या, अन् रसिकांनीही ‘उतू’ जाईपर्यंत दाद दिली.. त्यामुळे हा कार्यक्रम ठरला अविस्मरणीय!
सोमवार २१ ऑक्टोबरच्या सायंकाळी ७ वाजता दाटून आलेल्या मेघांना दूर सारत सारत चंद्राचे प्रतिबिंब पृथ्वीवर डोकावले, अन् गर्दे सभागृहाच्या भरगच्च गर्दीत उगवली काव्याची पौर्णिमा. आरंभी मित्रांगण परिवारातील दिवंगत सदस्य प्रकाश जोशी, विक्की चव्हाण यांच्या दिवंगत मातोश्री, गझलकार सतीश दराडे व रतनजी टाटा यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्यभरात प्रसिद्ध गझलकार गोपाल मापारी यांनी कवी अनंत राऊत यांना बुलढाणेकरांची ओळख करून देत आपल्या निवेदनाला सुरुवात केली. यानंतर अनंत राऊत यांनी एकापेक्षा एक सकस गझल व कवितांचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली.
“जगाचा वेग हा माझ्या मनाला भावला नाही..” “बोललो कित्येकदा पण व्यक्त होणे टाळले..” “आयुष्याच्या संध्याकाळी नभासारखे व्हावे..” अशा अनेक दर्जेदार कविता त्यांनी सादर केल्या. शेवटी “मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा..” हि कविता अनोख्या अंदाजाने सादर करून उपस्थित श्रोत्यांना सामावून घेत अनंत राऊत यांनी रसिकांची भावनिक दाद मिळवली. यावेळी मैत्री गहीवरून गेल्याची प्रचीती अनेकांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन मित्रांगण परिवाराचे चंदशेखर जोशी, आनंद संचेती, कमलेश कोठारी, डॉ. राजेश्वर उभरहंडे, मनोज बुरड, रणजीतसिंग राजपूत, सुनीता प्रकाश जोशी, रितेश जैन यांनी केले. सूत्रसंचालन रणजीत राजपूत यांनी केले.
रसिकांचा उत्साह पाहून भारावलो..
मी आजवर अनेक कार्यक्रम केली. रसिकांची चांगली दाद मिळणे, ही एका कलाकाराची प्रामाणिक अपेक्षा असते. मात्र गझल व कवितेची जाण असणारा असा रसिक मला बुलढाण्यात पहायला मिळाला, अशा शब्दांत अनंत राऊत यांनी रसिकजणांचे कौतुक केले. तसेच आभारही मानले.