काँग्रेसच्या आपत्ती व्यवस्थापन समिती बैठकीत आमदार देशमुख यांची घोषणा!
लातूर (MLA Amit Deshmukh) : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले असून सरकारने (Govt) जाहीर केलेल्या हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदतीच्या अध्यादेशाची होळी लातूर जिल्ह्यातील गावोगाव करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. मागच्या महिनाभरात अतिवृष्टी (Heavy Rain) आणि नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे लातूर जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आणि आपत्तीग्रस्तांना आधार देण्याच्या दृष्टीने नियुक्त केलेल्या काँग्रेस पक्षाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची (Disaster Management Committee) शनिवारी लातूर येथे काँग्रेस भवनात माजी मंत्री आमदार अमित देशमुख (MLA Amit Deshmukh) यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आमदार देशमुख यांनी या आंदोलनाची घोषणा केली. बैठकीला (Meeting) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पूर येऊन खरीप, बागायती पिके आणि फळबागांचे प्रचंड नुकसान!
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि संपूर्ण सप्टेंबर महिन्यात लातूर जिल्ह्यात सातत्याने अतिवृष्टी होत राहिली. कमी वेळेत अधिक पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी नदी नाल्यांना पूर येऊन खरीप, बागायती पिके आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावात जाऊन नुकसानीचा आढावा घेतला. खरिपाची पिके जाग्यावरच कुजली आहेत. एवढेच नाही तर बऱ्याच ठिकाणी पिकांसह जमीन वाहून गेली आहे. शेती अवजारे, इलेक्ट्रिक मोटारी आणि अनेकांची जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेली, परिणामी लातूर जिल्ह्यात चार ते पाच हजार कोटींचे रुपयांचे नुकसान झाले असल्याचे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढाव्यातून पुढे आले आहे, असेही आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडले जाईल!
एकंदरीत अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान प्रचंड मोठे आहे त्यामुळे या परिस्थितीत शासनाने शेतकरी, शेतमजूर आणि शेतीवर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांना आधार देण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही याप्रसंगी बोलताना दिली. काँग्रेस पक्षाच्या वतीने यासाठी विधिमंडळात आवाज उठवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सरकारला भाग पाडले जाईल, प्रसंगी यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनेही केले जाईल, असे याप्रसंगी बोलताना सांगितले.
पीक कापणी प्रयोगावेळी दक्ष रहा!
आपण मागणी केल्याप्रमाणे ई-पीक पाहणीसाठी शासनाने ऑक्टोबर अखेरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. सदरील ई-पीक पाहणी व पुढे पीक कापणी प्रयोगाच्या वेळी स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी केले.