Gadchiroli :- जिल्ह्यातील विविध बँकांच्या शाखामध्ये तब्बल ४० हजारापेक्षा जास्त बँक खाती गेल्या १० वर्षापासून निष्क्रीय असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये तब्बल ७.७० कोटींची रक्कम शिल्लक आहे. सबंधित खातेधारकांनी दावा केल्यास त्यांना त्यांची रक्कम परत मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
७.७० कोटींची रक्कम शिल्लक, दावा केल्यास मिळणार रक्कम परत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार १० वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या बँक खात्यांतील (Bank account) ठेवी ‘ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी’ या निधीकडे हस्तांतरित केल्या जातात. मात्र, अशा ठेवीदारांना आपली रक्कम परत मिळविण्याचा संपूर्ण अधिकार आहे. यासाठी संबंधितांनी आपल्या बँकेत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये एकूण ४०,४९१ खाती निष्क्रिय असून, त्यातील एकूण रक्कम ७ कोटी ७० लाख रुपये इतकी आहे. यात २७९ शासकीय खात्यात ९३.५० लाख, १२,१५६ संस्थात्मक खात्यात ३.२२ कोटी आणि२८,०५६ वैयक्तिक खात्यात ३.५५ कोटींची रकम शिल्लक असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या जनजागृती मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या निष्क्रिय खात्यातील रक्कम परत मिळवावी. ही सर्वांसाठी सुवर्णसंधी असून, बँका व जिल्हा प्रशासन नागरिकांना पूर्ण सहकार्य करेल असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रशांत धोंगळे यांनी केले आहे.