सीसीटीव्ही फुटेज पाहणीनंतर तपासाला मिळाली गती!
हिंगोली (Motorcycle Theft) : वेगवेगळ्या ठिकाणी मोटार सायकल (Motor Cycle) चोरीस गेल्या होत्या. त्या अनुषंगाने हिंगोली शहर पोलिसांच्या डिबी पथकाने तपास सुरू केला असता एका चोरट्याकडून तीन मोटार सायकल जप्त करून चोरट्याला अटक (Thief Arrested) केली.
तिन्ही 60 हजार रुपयाच्या मोटार सायकल जप्त!
हिंगोली शहरात अनेक ठिकाणी मोटार सायकल चोरीच्या घटना घडल्या आहेत. 20 मे रोजी भुजाजी लिंबाजी दांडेगावकर यांची मोटार सायकल क्रमांक एमएच 38 एन 3176 ही चोरीस गेल्याने 21 मे रोजी हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तसेच कडती येथील बाबुराव महादू जाधव यांची हिरो होंडा स्पेलंडर मोटार सायकल क्रमांक एमएच 38 के 6537 ही 20 हजार रुपयाची 19 मे रोजी चोरीस गेल्याने गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या मोटार सायकल चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक एस. के. मोदे यांनी डिबी पथकाला दिल्या होत्या. त्यावरून डिबी पथकाने दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज काढून विविध पोलिस ठाण्याला तसेच इतर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) व्हॉट्स अपवर टाकले असता हिंगोली शहर पोलिसांच्या डीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) मधील चोरटा वाशिम येथील असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शिवाजी रामदास राठोड याचा शोध सुरू केला.
याच दरम्यान रामदास राठोड हा चोरीतील मोटार सायकल विक्री करण्याकरीता ग्राहक बघत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर, हिंगोलीतील दोन मोटार सायकल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. तसेच त्याच्याकडे पोलिस ठाणे मेहकर जिल्हा बुलढाणा येथील हिरोहोंडा एचएफ डिलक्स मोटार सायकल क्रमांक एमएच 28 एयु 2872 ही सुध्दा मिळून आली. या तिन्ही 60 हजार रुपयाच्या मोटार सायकल जप्त करून शिवाजी रामदास राठोड रा डोंगरखंडाळा जि. बुलढाणा ह.मु. वाशिम याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास शेख मोहम्मद हे करीत आहेत.
हिंगोली शहर पोलिसांच्या डीबी पथकाची कामगिरी
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस. के. मोदे यांच्या नेतृत्वात डिबी पथकातील अशोक धामणे, गणेश वाबळे, धनंजय क्षिरसागर, संतोष करे, गणेश लेकुळे, अजहर पठाण तसेच हिंगोली शहर पोलिसांच्या डीबी पथकाने केली आहे.




 
			 
		

