परभणी शहर महापालिकेतील प्रकार!
परभणी (Municipal Corporation) : महापालिकेमधून जन्म मृत्युचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तीन ते चार महिन्याचा वेळ लागत आहे. यामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच प्रक्रिया सुरळीत करुन वेळेत प्रमाणपत्र द्यावेत, या मागणीकरीता सोमवार २९ सप्टेंबर रोजी मनसेचे सोनू लाहोटी यांनी बी. रघुनाथ सभागृहात आंदोलन केले.
ऑनलाईन प्रक्रियेचा खोडा!
जन्म आणि मृत्युचे प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने मिळते. काही दिवसापूर्वी संकेतस्थळामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमाणपत्राची प्रक्रिया किचकट झाली आहे. रुग्णालयांनी सुरुवातीला ऑनलाईन नोंदणी करावी, त्यानंतर बी. रघुनाथ सभागृहामधून अर्ज केल्यावर प्रमाणपत्र दिल्या जाते. ऑनलाईन प्रक्रियेमध्ये (Online Process) खोडा येत असल्याने मोठी अडचण झाली आहे. प्रमाणपत्र मिळण्यास तीन ते चार महिन्याचा वेळ लागत आहे. यामुळे सामान्य नागरीक हैराण झाले आहेत. प्रमाणपत्रासाठी आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोपही सोनू लाहोटी यांनी केला. प्रमाणापत्र देण्याची सर्व प्रक्रिया सुरळीत करावी, वेळेवर प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक उपाय योजना कराव्यात, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
अपुरे कर्मचारी आणि धिमे संकेतस्थळ!
जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्रासाठी बी.रघुनाथ सभागृहात दररोज शेकडोच्या संख्येने अर्ज येत आहेत. सदर अर्ज निकाली काढण्यासाठी याठिकाणी पुरेशा प्रमाणात कर्मचारी नाहीत. त्यात संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केल्याने अडचण झाली आहे. कधी संकेतस्थळ धिमे चलते तर कधी वीज पुरवठा खंडित होतो. अशावेळी प्रमाणपत्राची प्रतिक्षा वाढत आहे. सदर कार्यालयात कर्मचार्यांची संख्या वाढवावी, आवश्यक सोयी – सुविधा उपलब्ध करुन देणे देखील गरजेचे आहे.




