25 जुलै रोजी नगर विकास विभागाकडे पाठविले जाणार!
यवतमाळ (Municipal Elections) : मागील 4 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली. न्यायालयाच्या निर्देशानंतर नगर परिषदेच्या (City Council) प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने (Administration) प्रभाग रचनेची तयारी सुरू केली होती. 18 जुलै रोजी जिल्ह्यातील 10 नगर पालिकेच्या प्रभाग रचनेचा मसुदा तयार झाला असून या मसुद्यावर प्रभाग रचना गठीत केलेल्या समितीच्या स्वाक्षर्या झाल्या आहेत.
प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव!
25 जुलै रोजी जिल्ह्यातील 10 नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व दहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यामार्फत नगर विकास विभागाकडे (Department of Urban Development) पाठविण्यात येणार आहे. हा प्रस्ताव नगर विकास विभाग राज्य निवडणूक आयोगास 30 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत पाठवणार असून 18 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यातील दहा नगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार असून 22 सप्टेंबर ते 1 सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी प्रभाग रचनेच्या हरकती व सूचनेवर सुनावणी घेणार आहेत. तर अंतिम प्रभाग रचना 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रसिद्ध होणार आहे. अंतिम प्रभाग रचने नंतर जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडती चा कार्यक्रम जाहीर होणार असून. आरक्षण सोडतीवरच भावी उमेदवारांचे आपआपल्या प्रभागातील राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आरक्षणसोडत झाल्यावर खर्या अर्थाने जिल्ह्यातील नगरपालिकांच्या युती आघाड्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीत 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी अंतिम!
नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने (Election Commission) नियोजन सुरू केल आहे. एकूण मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका घेण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. त्यासाठी 1 जुलै 2025 पर्यंत नावे नोंदविलेली विधानसभेची मतदार यादी (Electoral Roll) वापरण्याचे नियोजन करण्यात येत आहे.