वर्धा (Nagar Parishad Voter List) : जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणुकीची तयारी जोमात सुरू आहे. विभाग रचना आणि अध्यक्षपद आरक्षण घोषित झाल्यानंतर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र या यादीत मोठ्या प्रमाणात गोंधळ व त्रुटी आढळल्याने नागरिकांकडून आक्षेपांची झोड उठली आहे. मतदार यादीवरील आक्षेप नोंदविण्याची अंतिम मुदत १७ ऑक्टोबर होती. दुपारपर्यंत तब्बल २ हजार २ आक्षेपांची नोंद झाली होती. त्यामुळे आता, बी.एल.ओ. नी खरंच घरबसल्या मतदार यादी तयार केली काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी आणि सिंदी (रेल्वे) या (Nagar Parishad Voter List) नगर परिषदांच्या निवडणुका तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत आहेत. पण जाहीर झालेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गैरसोयी आढळल्या आहेत. एका प्रभागातील मतदारांचे नाव दुसऱ्या प्रभागात दिसत आहे, काहींची नावे यादीतून वगळली गेली आहेत, तर काही मृत व्यक्तींची नावे अजूनही कायम आहेत.
निवडणूक आयोगाने यादी तयार करण्यासाठी प्रत्येक बी.एल.ओ.ला घराघरात जाऊन सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. परंतु यादीतील त्रुटी पाहता असे वाटते की अनेकांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण न करता घरबसल्या यादी तयार केली आहे. जुन्या नावांची पुनरावृत्ती झाली असून नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांची नावे गायब असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा प्रकारच्या त्रुटी यापूर्वी कोणत्याही नगर परिषद निवडणुकीत झाल्या नसल्याचे जाणकार सांगत आहेत. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होताच मतदारांमध्ये संताप उसळला असून मोठ्या प्रमाणात आक्षेप दाखल करण्यात आले आहेत. दि. 17 च्या दुपारपर्यंत सहा नगर परिषदांत मिळून २ हजार २ आक्षेप नोंदविण्यात आले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नगर परिषद निवडणुकीत (Nagar Parishad Voter List) उतरू इच्छिणारे उमेदवार मतदार यादी बारकाईने तपासत आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात गोंधळ समोर येत असल्याने योग्य दुरुस्ती न झाल्यास अनेक इच्छुक उमेदवार न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास निवडणुकीची प्रक्रिया आणखी विलंबित होण्याची शक्यता आहे.
शुक्रवार दुपारपर्यंत नोंदवलेले आक्षेप (१७ ऑक्टोबरपर्यंत)
वर्धा नगर परिषद – 266
हिंगणघाट – 83
आर्वी – 328
पुलगाव – 576
देवळी – 87
सिंदी (रेल्वे) – 662
सर्व आक्षेपांवरील दुरुस्ती करून ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, तर ७ नोव्हेंबरला मतदान केंद्रनिहाय यादी जाहीर केली जाईल.