पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा याबाबत सत्कार!
नांदेड (Nanded Police) : एजंट मार्फत मुंबईहून कंबोडिया देशात गेलेल्या तरुणास मारहाण करून डांबून ठेवल्याची माहिती नांदेड पोलीसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी कंबोडिया देशातील दूतावासास संपर्क साधून सदर तरुणास मायदेशी आणण्यात यश आले असून पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांचा याबाबत सत्कार करण्यात आला.
नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले!
रहिमपूर वसरणी येथील रहिवासी तरुण शेख समीर शेख महेबुब (25) हा २५ फेब्रुवारी रोजी एजंट मार्फत जॉबसाठी मुंबई येथुन कंबोडीया या देशात गेले असता तिथे गेल्यावर शेख समीर यांना बेकायदेशीर क्रिप्टो करन्सी स्कॅमचे काम करण्यास सांगण्यात आले. सदर काम करण्यास त्यांनी नकार दिला असता त्यांना तेथे सदर काम करणेबाबत त्यांचेवर जबरदस्ती करत त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात करण्यात येत असे. या मारहाणीचा व्हिडीओ संबंधित नातेवाईकांना पाठवून पैश्याची मागणी करण्यात येत असे. याबाबत नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांची भेट घेऊन हकीकत सांगितल्यानंतर त्यांना सांगितली असता त्यांनी सदर प्रकरणी तात्काळ कार्यवाही सुरू करून कंबोडीया देशातील भारतीय दूतावास कार्यालयाशी (Indian Embassy Office) संपर्क साधला व त्यांच्या संपर्कात राहून पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथील एक पत्र शेख समीर यांच्या नातेवाईकांना देवून त्यांना मिनीस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कार्यालय, दिल्ली येथे तक्रार देणे कामी पाठविले होते. दरम्यान त्यानुसार कारवाई पूर्ण झाल्यानंतर कंबोडिया देशातील दूतावासाशी संपर्कात असलेले पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या प्रयत्नाला यश आले असून १४ ऑगस्ट रोजी शेख समीर शेख महेबुब हे सुरक्षितरित्या भारतात परत आले आहेत. याबाबत नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाचे व विशेषतः पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांचे आभार मानले.