हिंगोली (Narayana English School) : शहरात सुरू असलेलया नारायण इंग्लिश स्कूल (Narayana English School) या शाळेला शिक्षण विभागाने टाळे ठोकले असून ३३ लाख ६० हजाराचे दंड तात्काळ भरण्याचे आदेशही दिले आहेत.
हिंगोली शहरातील नारायण नगर भागात मागील काही वर्षांपासून नारायणा इंग्लिश स्कूल (Narayana English School) सुरू आहे. या शाळेला शासनाची मान्यता नसल्याच्या तक्रारी शाळा सुरू झाल्यापासुन शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाकडे येत होत्या. यावरून ४ जुलै रोजी गट शिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश टेकाम, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश सोनुने, केंद्र प्रमुख शेषराव असोले, मुख्याध्यापक के.एन. मास्ट व केंद्र प्रमुख विजय मानकर या पाच अधिकार्यांच्या पथकाने नारायणा इंग्लिश स्कूलला भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली.
या तपासणीत शाळेला शासन मान्यता असल्याचे पत्र न मिळाल्याने याच भितीत ३३ लाख ६० हजार रुपये दंड शाळा प्रशासनाला ठोठावण्यात आला आहे. तसेच ५ जुलै पासुन या शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे समायोजन जवळच्या शाळेत करण्यात यावे व शाळेची मान्यता येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत. तपासणीनंतर (Narayana English School) शाळेच्या दर्शनी भागात फलक लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये शाळेला मान्यता नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले असुन पालकांनी आपल्या पाल्यांचा या शाळेत प्रवेश घेऊ नये अशी सूचनाही करण्यात आली आहे.
शिक्षण विभागातच अनागोंदी
हिंगोली शहरातील नारायणा इंग्लिश स्कूलही (Narayana English School) शाळा सुरू झाल्यापासुन शाळेच्या मान्यतेचा विषय नेहमीच चर्चेला येत असतो. यापूर्वीही शाळेला मान्यता नसल्याचे सांगुन शिक्षण विभागाने गतवर्षी शाळा बंद करून असेच दर्शनी भागात फलक लावले होते. त्यानंतर ते फलक कोणी व का काढले, वर्षभर शाळा कशी सुरू राहीली असे अनेक प्रश्न शिक्षण विभागाच्या आजच्या कारवाईमुळे विचारले जात आहेत.
१६ एप्रिल २०२४ रोजी तत्कालिन गट शिक्षणाधिकार्यांनी ही शाळा बंद केल्यानंतर वर्षभर शाळा सुरू असल्याचे शिक्षण विभागाला का दिसून आले नाही, असा सवालही उपस्थित केला जात आहे.मागील वर्षभर शिक्षण विभागाने ही शाळा कशी चालू दिली, याची चौकशी जिल्हाधिकार्यांनी सक्षम अधिकार्यांमार्फत करून घ्यावी, अशी मागणीही पालक करीत आहेत.