नविन नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा फटका
दोन किमी ऐवजी चार-पाच किमीचा फेरा
सेंदूरवाफा (Nagzira Tiger Reserve) : साकोली तालुक्यातील आतेगाव ते उमरझरी हे दोन किलोमीटरचे अंतर असून आधी या दोन्ही गावातील लोकं शेतीकामानिमित्त नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील रस्त्याने ये-जा करायचे. आतेगाव, उमरझरी व शिवणटोला ही तीन गावे मिळून गटग्रामपंचायत आहे. नवीन नागझिरा व्याघ्र प्रकल्पामुळे हा रस्ता आता गावकर्यांसाठी बंद झाला. त्यामुळे आतेगावच्या लोकांना बाम्पेवाडा मार्गे चार-पाच किमीचा प्रवास करावा लागतो.
व्याघ्र प्रकल्पाची (Nagzira Tiger Reserve) सीमारेषा आतेगावला लागून आहे. गावातील जनावरे आधी जंगलात चरायला जायची. आता गावात एक हेक्टरही जागा चराईसाठी ठेवण्यात आली नाही. त्यामुळे गावातील बर्याच लोकांनी जनावरे विकली. सरकार एकीकडे पशुपालनाला प्रोत्साहन देते. दुसरीकडे या गावातील चराईचे क्षेत्र आता प्रतिबंधित करण्यात आले आहे. उमरझरीवरून गेटकडे जाणार्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. शिवाय गेटकडे जाणार्या रस्त्यावर लावण्यात आलेल्या दिशादर्शकावर वेली वाढल्या आहेत. त्या वेलींनी फलक पूर्णपणे झाकला गेला आहे. याकडे वाईल्ड लाईफच्या अधिकार्यांचे लक्षच नाही.
आमदारांचा फोन गेल्यानंतर सिंचन करू देणार का? : आतेगावच्या खालच्या भागात पूर्वेकडे तलाव आहे. या तलावाचे आता दोन भाग झाले. अर्धा भाग वाईल्डलाईफमध्ये गेला. दोन वर्षांपूर्वी या तलावाचे खोलीकरण करायचे होते. तेव्हा वनकर्मचार्यांनी जलसंधारण विभागाला अर्धा तलाव खोलीकरण करू दिला नाही. हा भाग वाईल्ड लाईफमध्ये येतो. त्यामुळे तलावाचे खोलीकरण करता येणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. 
ज्या अर्ध्या तलावाचे खोलीकरण करण्यात आले. त्याची मातीसुद्धा वाईल्डलाईफच्या कर्मचार्यांनी त्यांच्या सीमेवर फेकू दिली नाही. त्यामुळे गावातील नागरिक संतप्त झाले आहेत. अशाच प्रकारचा अडथळा निपरटोला येथील तलावाच्या खोलीकरणासाठी वाईल्ड लाईफने आणला. परंतु आ. नाना पटोले यांचा साकोली येथील उपसंचालकांना फोन गेल्यानंतर तलावाचे खोलीकरण करून देण्यात आले. त्यामुळे आमदारांच्या फोननंतरच काम होत असेल, तर आ. नाना पटोले यांनी यासाठी पुढाकार घेऊन शेतकर्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटवावा अशी मागणी करण्यात येत आहे.
गावातील तरुण रोजगारासाठी शहरात : व्याघ्र प्रकल्प होण्याआधी गावातील ५० च्या वर कुटुंबांना जंगलात सुमारे सहा महिने रोजगार मिळत होता. आता हंगामी मजूर तीन महिन्यांसाठी ठेवण्यात येतात. तेसुद्धा एका गावातून एक-दोन जण राहतात. या हंगामी मजुरीतही मोठ्या प्रमाणात घोळ सुरू आहे. (Nagzira Tiger Reserve) वाईल्डलाईफच्या कामावर जाण्यासाठी नागरिक अनुत्सुक असतात. रोजगार मिळत नाही म्हणून गावातील सुमारे ५० युवक रोजगारासाठी शहरात जातात. ही परिस्थिती फक्त आतेगावची नाही. तर कोअरझोनलगतच्या गावांत जवळपास अशीच परिस्थिती आहे.




 
			 
		

