सदस्यांना विश्वासात न घेता काम करत असल्याचा आक्षेप
वर्धा (Satoda Gram Panchayat) : शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतीत सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. सभागृहास विश्वासात न घेता काम करतात, असा आक्षेप घेत सरपंचाविरोधात अविश्वास ठराव सादर करण्यात आला होता. त्यास बहुतमताने मंजुरी मिळाल्याने आता नवीन सरपंच कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरालगतची (Satoda Gram Panchayat) साटोडा ही ग्रामपंचायत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत आहे.
साटोडा येथील ग्रामपंचायतीच्या (Satoda Gram Panchayat) सरपंचपदी बादल उर्फ हरीश विरुटकर कार्यरत होते. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सरपंच बादल उर्फ हरीश विरुटकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव सादर केला. त्या अनुषंगाने सभा ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. विशेष सभेला अध्यासी अधिकारी म्हणून तहसीलदार संदीप पुंडेकर, ग्रामविकास अधिकारी विलास नव्हाळे, विस्तार अधिकारी सुनील गावंडे, मंडळ अधिकारी आदे उपस्थित होते. सभेला १७ पैकी १४ सदस्य उपस्थित होते. तीन सदस्य गैरहजर होते. सभेत तेरा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. बहुमताने सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव पारित झाला. बादल विरुटकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित झाल्याने आता नव्याने सरपंचाची निवड करावी लागणार आहे.
पुढे ही प्रक्रिया पार पडेल. मात्र सरपंच बादल विरुटकर यांच्यावर अविश्वास ठराव पारित झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झालेली आहे. याअगोदर अजय जानवे सरपंच (Satoda Gram Panchayat) होते. दरम्यान, अजय जानवे यांच्यावर अविश्वास ठराव आणल्या गेल्याने पायउतार व्हावे लागले. आता बादल विरुटकर यांच्यावर अविश्वास ठराव आणल्या गेला आहे. काही महिन्यांचा कालावधी राहिलेला असल्याने नवीन सरपंच कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.