एकच नारा समायोजन करा अशा दिल्या घोषणा
हिंगोली (NRHM Contract Employees) : गेल्या दहा दिवसापासून जिल्ह्यातील ५५० आरोग्य कर्मचार्यांनी जिल्हा परिषदे समोर विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. २८ आँगस्ट गुरुवार या कर्मचार्यांनी मोर्चा काढुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी मोर्चात सहभागी कर्मचार्यांनी एकच नारा समायोजन करा, देत कसे नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा दिल्या नंतर निवेदन देण्यात आले.
दहा वर्ष पूर्ण झालेल्या (NRHM Contract Employees) कर्मचार्यांना समायोजन करणे, मानधनात सरसकट वाढ करावी, तीन वर्ष किंवा पाच वर्ष सेवा पूर्ण झालेल्या अधिकारी, कर्मचार्यांना लॉयल्टी बोनस लागू करावा या प्रमुख मागण्यासाठी जिल्ह्यातील ५५० आरोग्य कर्मचार्यांनी जिल्हा परिषदे समोर १९ आँगस्ट मंगळवार पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प पडले असून कार्यालयही ओस पडले आहे.
जिल्ह्यातील ५५० कंत्राटी अधिकारी, (NRHM Contract Employees) कर्मचारी विविध पदावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचार्यांना नियमित सेवेत समायोजन करण्यासाठी शासनाने शासन निर्णय काढला होता. शासन निर्णयास सव्वा वर्ष उलटले तरीही शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, परिणामी मानधनवाढ, लॉयल्टी बोनस, बदली धोरण मान्य होत नाही. आठ व दहा जुलै रोजी संघटनेच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन दिलेल्या आश्वासणाची पूर्तता करावी आणि समायोजन प्रक्रिया यासह विविध मागण्या मान्य करण्यासाठी चर्चा केली.
मात्र अद्याप कुठलाही निर्णय आरोग्य मंत्र्यांनी घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील ५५० अधिकारी, कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केल्याने कामकाज ठप्प पडले आहे. दरम्यान या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचार्यांनी गुरुवारी मोर्चा काढला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सर्व कर्मचारी एकत्र आले होते. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर हा मार्चा इंदिरा गांधी चौक, नंतर अग्रसेन चौक मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या (NRHM Contract Employees) आंदोलनात विशाल.ठोंबरे, शंकर तावडे, श्रीपाद गारुडी, पी. एस. गिरी, सचिन करेवार, नरेंद्र बुरसे, बी. आर, खेबाळे, बी. डी. शेळके, दीपक पवार, पी. व्ही. बेले, शेख मुनाफ, आर. व्ही. घुगे, आर. टी. पुंडगे, पी. एल. कुलकर्णी, बालाजी उबाळे, डॉ. शारदा मेश्राम, जी. व्ही. आघाव, गणेश ठोके, राहुल मोरे, सुकेशनी ढवळे, अनुराधा पथरोड, सोनी कुरील, रेखा टेकाळे, जिजाबाई गिरी, वर्षा घुले, डॉ. विसलकर, सविता खिल्लारे, बापू सूर्यवंशी, प्रियंका राठोड, सुरेश शेवाळे, आदी शेकडो कर्मचारी सहभागी झाले आहेत.
कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी एकत्रिकरण समिती संघटनेच्या माध्यमातून विविध मागण्या पदरात पाडण्यासाठी बेमुदत आंदोलन सुरु केल्याने कार्यालयात खुर्च्या रिकाम्या पडल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषद, सामान्य रुग्णालयातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने दोन्ही ठिकाणचे कामकाज ठप्प पडले.