हॉस्टेल बांधा, अन्यथा खोली भाडे द्या’ विद्यार्थ्यांची मागणी!
नांदेड (NSUI Student Union) : शहरातील श्री गुरु गोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, अन्यथा प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिमहिना दोन हजार रूपये खोली भाडे द्यावे, या प्रमुख मागणीसाठी ९ ऑक्टोबर रोजी आयटीआय कॉलेजसमोर एनएसयूआय विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.
देशोन्नतीच्या बातमी ने विद्यार्थी संघटना उतरली मैदानात!
ग्रामीण भागातून आलेल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांची वसतिगृहाअभावी मोठी हेळसांड होत असून, आठ वर्षांपासून वसतिगृहाचे बांधकाम रखडल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.त्यामुळे दैनिक देशोन्नतीने येथील वसतिगृहाचा प्रश्न सातत्याने लावून धरला आहे.याच बातमीची दखल घेवून विद्यार्थी संघटना आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आता मैदानात उतरली आहे.गुरूवारी शासकीय आयटीआय काॅलेज समोर जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र निदर्शने करण्यात आली.
विद्यार्थी आणि एनएसयूआयचे पदाधिकारी उपस्थित!
वसतिगृहाअभावी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड तातडीने थांबवावी यासाठी नवीन वसतिगृह इमारतीच्या बांधकामाला तातडीने मंजुरी देऊन काम सुरू करावे, वसतिगृह तातडीने उपलब्ध करून द्यावे, अन्यथा प्रतिमहिना विद्यार्थ्याला दोन हजार रूपये रूम भाडे मिळावे, या मागणीसाठी एनएसयूआय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे आणि महाराष्ट्र प्रभारी अक्षय क्रांतिवीर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात गोविंद पाटील, अनिल पाटील, शंतनु कळणे, शुभम भोसीकर, सोपान पाटील, इमदाद शेख, शुभम तांबे, डॉ. आदित्य सोंडारे,शुभम पांचाळ, अमोल राजेगोरे, अक्षय नलगे, अजर शेख, रहीम मुंडकर, बालाजी जोगदंड, वैभव पोपुलवाड, रोहित पावडे, समर्थ कुंडले, ओंकार उबाळे, साहेब सोनकांबळे, सिद्धार्थ वाघमारे, मोहन सूर्यवंशी, साईनाथ कदम, भागवत कदम, तुकाराम खंडाळे, गोविंद उबाळे, प्रवीण जाधव स्वप्निल पवार, विष्णू नाईक, साईनाथ राठोड, गणेश हमने, शिवलिंग मठपट्टी, कंठीराम इंगळे, ओमकार उबाळे, नागेश कांबळे, आकाश शिंदे, सिताराम टेकाळे, युवराज जिनेवाड, गजानन लोखंडे, शुभम भद्रे, मनीष वैद्य, प्रशांत तर्फेवाड, आर्यन सातव, सुरज सावंत, आरुष बोरकर, कृष्णा गंजेवार, देवराज नरवाड, नरेश काटकमवार यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि एनएसयूआयचे पदाधिकारी उपस्थित होते.
८ वर्षांपासून वसतिगृह बंद, विद्यार्थ्यांची परवड!
आयटीआय येथील मुलांचे वसतिगृह (ITI Boys Hostel) मागील आठ वर्षांपासून बंद असल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोली भाडे भरावे लागत आहे, ज्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच संकटात आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांच्या मुलांना शहरात भाड्याने खोली घेऊन राहणे शक्य होत नसल्याने आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.