मागील 53 वर्षाची अखंड परंपरा!
परभणी (Palanquin) : परभणीतील गंगाखेड येथील श्री विठ्ठलाच्या लाडक्या भक्तांपैकी एक असलेल्या गंगाखेड येथील श्री संत जनाबाई यांची पालखी दि. 23 जुन सोमवार रोजी पंढरपुरकडे रवाना होणार आहे. याप्रसंगी सर्व महिला व पुरुष वारकरी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पालखी प्रमुख शिवाजी चौधरी व संत जनाबाई संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
भाविक भक्त मोठ्या भक्तीभावाने सहभागी!
परभणीच्या गंगाखेड येथे जन्मलेल्या श्री संत जनाबाई यांना पंढरपूर दरबारी आदराचे स्थान असुन संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्या समकालीन संत जनाबाई यांची दिंडी (Saint Janabai Dindi) 1972 पासून दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे (Pandharpur) रवाना होते. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता येथील वारकरी बांधवांनी गेल्या 53 वर्षापासून (कोरोना कालावधीतील एका वर्षाचे अपवाद वगळता) संत जनाबाई यांच्या दिंडीची (पालखी) परंपरा कायम ठेवली आहे. संत जनाबाई यांची निस्सिम भक्ती पाहून भगवंत विठ्ठल संत जनाबाई यांच्या मदतीला धावून आले व त्यांनी संत जनाबाई यांच्या प्रत्येक कामात हातभार लावल्याचा उल्लेख अनेक अभंगात व वारकरी (Warkari) संप्रदायातील ग्रंथात पहावयास मिळत असल्याने संत जनाबाई यांना श्री विठ्ठलाच्या लाडक्या भक्तापैकी (Devotee) एक म्हटल्या जाते. दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीला गंगाखेड येथून पंढरपूरच्या वारीसाठी पायी निघणाऱ्या संत जनाबाई यांच्या दिंडीत (Dindi) महाराष्ट्रातील विविध भागासह गंगाखेड परिसरातील मुळी, पोरवड, सायळा सुनेगाव, वडगाव स्टेशन, धारखेड, हरंगुळ, महातपुरी, मरडसगाव आदी गावातील कीर्तनकार, मृदंगाचार्य, टाळकरी, झेंडेकरी यांच्यासह अन्य सेवा देणारे वारकरी बांधव, भाविक भक्त मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सोमवार 23 रोजी गंगाखेड येथून निघून पडेगाव, परळी वै. अंबाजोगाई, संत तुकाराम पावन धाम, राम वडगाव, हासेगाव, येरमाळा, बार्शी, रिधोरा, लऊळ, आष्टी आदी ठिकाणी मुक्काम करून पंढरपुरच्या दिशेने जाणाऱ्या या दिंडीत (पालखीत) वारकरी भक्त मंडळीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दिंडी (पालखी) प्रमुख शिवाजी चौधरी यांच्यासह संत जनाबाई संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.




