५०% जागांवर महिलांचा दबदबा; इच्छुकांचे लक्ष वेधले!
नांदेड (Panchayat Committee) : आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठीची (Panchayat Samiti Elections) उत्सुकता वाढवणारी नांदेड पंचायत समिती सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत आज, १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली आहे. या सोडतीमुळे १० पैकी तब्बल ५ जागांवर महिला राज स्थापित झाले असून, यामुळे इच्छूक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना आता अधिकच वेग येणार आहे. उपविभागीय कार्यालयाच्या बैठक कक्षात नियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार तथा आरक्षण सोडत अधिकारी संजय वारकड यांनी शांततेत ही सोडत प्रक्रिया पार पाडली.
नांदेड पंचायत समितीच्या १० निर्वाचक गणांमधील सदस्य पदांचे आरक्षण सोमवारी निश्चित!
नांदेड पंचायत समितीच्या १० निर्वाचक गणांमधील सदस्य पदांचे आरक्षण (Reservation) सोमवारी निश्चित करण्यात आले आहे.यात ५ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ते पुढील प्रमाणे आहे. ३९ – कासारखेडा सर्वसाधारण महिला, ४० – वाजेगाव सर्वसाधारण, ४१ – मरळक बु) सर्वसाधारण, ४२ – वाडी बु.) अनुसूचित जाती महिला,४३ – लिंबगाव अनुसूचित जाती महिला,४४ – रहाटी बु.) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ४५ – धनेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ४६ – तुप्पा सर्वसाधारण,४७ – बळीरामपूर अनुसूचित जाती सर्वसाधारण,४८ – विष्णूपुरी सर्वसाधारण महिला अशा प्रकारे हे आरक्षण निश्चित झाले आहे.
या सोडत प्रक्रियेच्या वेळी प्रशिक्षणार्थी तहसीलदार अभयराज नानझुंडे, निवडणूक नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलु यांच्यासह तालुक्यातील नागरिक, राजकीय पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
इच्छूक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना येणार वेग!
५० टक्के जागा महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक विद्यमान सदस्यांना धक्का बसला असून, तर महिला कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. निश्चित झालेल्या आरक्षणानुसार आता संबंधित निर्वाचक गणांमध्ये निवडणुकीच्या तयारीसाठी इच्छुक उमेदवार सज्ज झाले असून, येत्या काळात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.