Parbhani auto accident :- परभणीच्या जिंतूर तालुक्यातील माणकेश्वर गावाजवळील तीव्र उतारावर सोमवार 28 एप्रिल रोजी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास शेतमजुरांनी भरलेला एका ऑटोचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने ऑटो चक्क उतरसमोरील घरावर जाऊन जोरात आदळले. या अपघातात (Accident) आठ शेतमजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ऑटोचा ब्रेक निकामी झाल्याने घडला अपघात
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील अंबरवाडी शिवारातील एका शेतात पांगरी येथील शेतमजूर भुईमूग काढण्यासाठी गेले होते. भुईमूग काढणी झाल्यानंतर ऑटो क्रमांक एम एच 22 एच 4037 मध्ये गावाकडे परत येताना माणकेश्वर परिसरातील तीव्र उतारावर ऑटोचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने ऑटो उतरसमोरील घरावर जाऊन जोरात आदळला. ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मजूर असल्याने वाहनाचा तोल सुटला आणि वाहन उलटले. ऑटोमधील आठ मजुरांपैकी काही जखमींना गंभीर दुखापत झाली असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात (Hospital) हलविण्यात आले आहे. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ अफरोज शेख, डॉ प्रमोद पारवे, डॉ अक्षय भंगीरे आदींनी जखमी सिंधुबाई गंगाधर बुधवंत वय ४७ ,कलावंती लक्ष्मण चांदणे वय ६५, आश्राबाई देविदास घनवटे वय ७०, जनाबाई बाबराव घुगे वय ५५,
मिराबाई बबन मोहोटे वय ३५, मीराबाई काशिनाथ मांदळे वय ४५, अनिकेत संतोष बुधवंत वय१२, आदित्य संतोष बुधवंत वय ११ यांच्यावर उपचार (Treatment) केले.
अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) तालुकाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत, अशोक बुधवंत यांनी जखमींना हलवण्यात परिश्रम घेतले. दरम्यान, गावकऱ्यांनी व प्रशासकीय यंत्रणांनी मदतकार्य करत जखमींना तत्काळ रुग्णालयात पोहोचवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




