परभणी (Parbhani) :- बोगस कागदपत्र दाखल करत जन्म दाखले मिळविण्यात आले आहेत. परभणीत देखील सदर प्रकार उघडकीस आला असून या बाबतच्या पुराव्याचे कागदपत्र पोलीस प्रशासनाकडे सादर केले आहेत. याची चौकशी करुन ४८ तासात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजपा (BJP) नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी केली.
माजी खा.किरीट सोमय्या यांची मागणी; कागदपत्र पोलिसांकडे केली सादर
बोगस कागदपत्रांच्या अधारे जन्म दाखले काढल्या जात आहेत, या बाबत किरीट सोमय्या(Kirit Somayya) यांनी राज्यभरात विविध जिल्ह्यांना भेटी दिल्या आहेत. काही महिन्यापूर्वी परभणीत आलेल्या किरीट सोमय्या यांनी ३ हजार २०२ बोगस जन्म दाखले देण्यात आले आहेत, असा आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवार २८ फेब्रुवारी रोजी माजी खा.किरीट सोमय्या परभणीत आले. नवा मोंढा पोलीस ठाण्यात त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. यावेळी कमलकिशोर आग्रवाल, डॉ. केदार खटींग, बाळासाहेब जाधव, संजय कुलकर्णी, मंगल मुदगलकर यांची उपस्थिती होती. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, परभणीत तहसिल कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या अर्जांपैकी केवळ १२ अर्ज रद्द करण्यात आले. प्राथमिक स्वरुपात २०० अर्ज तपासले असता त्यातील १३ जन्म दाखले बोगस आढळून आले. केवळ आधारकार्डच्या आधारावर जन्म दाखले देण्यात आले आहेत.
या प्रकरणाची चौकशी करावी, संबंधित प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे यांच्यावर ४८ तासात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.