परभणी (Parbhani police) : गंगाखेड येथे मानसिक तणावाखाली आत्महत्या करण्याच्या उद्देशाने घरातून बाहेर पडलेल्या गंगाखेड शहरातील एका ३० वर्षीय तरुणीचे प्राण स्थानिक पोलीसांच्या सतर्कतेमुळे व प्रभावी समुपदेशनामुळे वाचले. ही घटना रविवार २५ मे रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड शहरातील एका ३० वर्षीय तरुणीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. घरातून निघण्यापूर्वी तिने पोलीस निरीक्षकांच्या नावाने एक पत्र लिहून त्यात आत्महत्येचे कारण, स्वतःचा मोबाईल क्रमांक, अन्य मोबाईल क्रमांक, मोबाईल व त्यातील पर्सनल लॉकरचे पासवर्डचा समावेश होता. आत्महत्येच्या उद्देशाने घराबाहेर पडलेली तरुणी पोलीस ठाण्याजवळ पोहोचली आणि तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन आपली व्यथा ठाणे अंमलदार शेख फेरोज यांना सांगितली.
यावेळी अंमलदार शेख फेरोज यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिला (Parbhani police) पोलिस ठाण्यात थांबवले व तत्काळ प्रभारी अधिकारी सपोनि आदित्य लोणीकर यांना माहिती दिली. त्यानंतर सपोनि आदित्य लोणीकर व सपोनि सिद्धार्थ इंगळे यांनी संबंधित तरुणीशी एक तासाहून अधिक काळ संवाद साधून तिचे समुपदेशन केले. अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाचा परिणाम होऊन तरुणीने आत्महत्या न करण्याचा निर्णय घेतला. तरुणीच्या मानसिक स्थितीचा विचार करून तिच्या आई व भावाच्या ताब्यात तिला सुखरूप सोपवण्यात आले. पोलिसांच्या सजगतेमुळे एक अनमोल जीव वाचल्याची भावना शहरात व्यक्त केली जात आहे.




