Parbhani school news :- पालकसभेत महत्वाचे मुद्दे मांडत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी प्राथमिक शिक्षकास मारहाण (beating) करण्यात आल्याचा प्रकार सेलू तालुक्यातील कान्हड जि.प. शाळेत घडला. दुसर्या दिवशीही मारवाडी पाटीवर गाडी आडवून मारहाण केली. झाल्या प्रकाराची तक्रार देण्यासाठी बोरी पोलिस ठाण्यात शिक्षक गेल्यानंतर तेथे तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षकाने पोलिस अधिक्षकांनी निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रार नोंदवून घेण्यास बोरी पोलिसांची टाळाटाळ शिक्षकाचे पोलिस अधिक्षकांना निवेदन..!
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की, सेलू तालुक्यातील कान्हड जि.प. शाळेत १३ ऑगस्ट रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. पालकसभेत शिक्षक दिपक ज्ञानोबा सोळंके हे काही महत्वाचे मुद्दे मांडत असताना गावातील गजानन ज्ञानोबा डोंबे आणि गणेश नानाभाऊ डोंबे यांनी अचानक शिक्षक दिपक सोळंके यांंच्यावर हल्ला केला. फायबर खुर्च्यांनी (Fiber chairs) मारहाण करुन शालेय साहित्याचे नुकसान केले. दुसर्या दिवशी १४ ऑगस्ट रोजी शिक्षक दिपक सोळंके हे मारवाडी पाटीहून येत असताना काही गावगुंडानी त्यांची गाडी आडवून पुन्हा मारहाण केली. यानंतर शिक्षक दिपक सोळंके यांनी एमएलसी करुन घेत बोरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. मात्र ठाण्यातील पोलिस अधिकारी, कर्मचार्यांनी त्यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षक दिपक सोळंके यांनी थेट जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन सादर केले.गजानन डोंबे व गणेश डोंबे यांच्यापासून जिवीतास धोका निर्माण झाला असून त्यांच्या विरुध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या प्रकाराने शिक्षक दिपक सोळंके भयभित झाले असून कान्हड जि.प. शाळेत जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे इतरत्र पदनियुक्ती करण्याची देखील मागणी निवेदनात करण्यात आली आहे.