परभणी/गंगाखेड(Parbhani):- शहरातील परळी रस्त्यावरून गायीची कारवड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना काही जणांनी रंगेहाथ पकडून कारसह पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी मारोती गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
परभणीतील गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावर एका पेट्रोल पंपासमोर असलेल्या मारोती रुस्तुम गायकवाड रा. रमाबाई नगर गंगाखेड यांच्या आखाड्याजवळून रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास काही जण गायीची कारवड चोरून नेत असल्याची घटना घडली. जनावरांची देखभाल करणाऱ्या गड्याने ही बाब आखाड्यावर असलेल्या मारोती गायकवाड यांना सांगितली तेंव्हा गायकवाड यांच्यासह लखन गायकवाड, हिरामण जाधव, नितीन जाधव, विशाल गायकवाड, दिपक जाधव आदींनी गडी शिवा पडूळकर यांच्या दिशेने धावत जाऊन पाहिले असता रमेश मारोती शिंदे, संतोष राजू उर्फ बापू शिंदे दोघे रा. सागर कॉलनी पाथरी, गणेश शेषराव शिंदे रा. इंदिरा नगर पाथरी व अविनाश नारायण कापुरे रा. सिध्दार्थ नगर परभणी हे गायी सोबत चरत असलेली कारवड चोरून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसल्याने त्यांनी चौघांना पकडून चोप देत याची माहिती डायल ११२ वर फोन करून पोलीसांना दिली व कारसह चौघांना ही गंगाखेड पोलीस ठाण्यात (Police station) आणले.
चौघांना पकडून चोप देत याची माहिती डायल ११२ वर फोन करून पोलीसांना दिली
याप्रकरणी मारोती रुस्तुम गायकवाड वय ४० वर्ष रा. रमाबाई नगर गंगाखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात वरील चौघांना विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गौस खान पठाण हे करीत आहेत. सदर गुन्ह्यात कारवड चोरीची तक्रार देण्यात आली असली तरी हा प्रकार वराह चोरीचा असल्याची चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात होत होती.