परभणी/गंगाखेड(Parbhani):- इयत्ता बारावीच्या परीक्षेचा पेपर सोडवून परतत असतांना झालेल्या दुचाकीच्या अपघातात (Accident)दोन परीक्षार्थी विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी कोद्री जवळ घडली. दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात हलविले आहे.
दुचाकीच्या अपघातात दोन परीक्षार्थी विद्यार्थी गंभीर
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील कोद्री येथील परीक्षा केंद्रावर इयत्ता बारावीच्या परीक्षेचा पेपर सोडवून राहील खान जमीर खान वय १७ वर्ष, आदिल खान हैदर खान वय १८ वर्ष रा. गंगाखेड हे परीक्षार्थी विद्यार्थी दुचाकीवरून गंगाखेडकडे येत असतांना अचानक एक महिला दुचाकी समोर आल्यामुळे तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी रस्त्याखाली जाऊन झालेल्या अपघातात दोन्ही परीक्षार्थी विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २:३० वाजेच्या दरम्यान कोद्री गावाजवळ घडली. अपघाताची माहिती समजताच परीक्षा बंदोबस्त गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण, जमादार दत्तराव चव्हाण, पो. शि. शेख हुसेन, चालक शेख कलंदर आदींनी दोन्ही जखमी विद्यार्थ्यांना शासकीय पोलीस वाहनातून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल केले.
दोन्ही जखमींच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा टाके, परिचारिका प्रणिता शिंदे, शितल पांचाळ, कमलबाई ठाकूर आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलविले.