Gadchiroli :- कोरची ते सिरोंचा पर्यंत पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता सद्यास्थितीत असलेल्या रूग्णवाहिका अपुर्या पडत असल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. यामुळे रूग्णवाहिकांची (Ambulance) संख्या वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
बहुतांश रूग्णवाहीका जिर्ण होऊन भंगारात गेल्या आहेत
प्राप्त माहितीनुसार सन २०२३-२४ या वर्षात जिल्ह्यामध्ये शासकीय १४ रुग्णालये, ३३ दवाखाने व ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रे (Health Centers) कार्यरत आहेत. त्यामध्ये २७३ डॉक्टर्स आणि ४४४ परिचारीका काम करीत आहेत. उपप्रादेशिक परीवहन अधिकारी यांच्याकडील नोंदीनुसार २०२२ मध्ये २३३ रूग्णवाहीकांची नोंद होती. २०२३ मध्ये ही संख्या २५२ एवढी झाली. यातील बहुतांश रूग्णवाहीका जिर्ण होऊन भंगारात गेल्या आहेत. जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १०,७२,९४२ आहे आणि लोकसंख्येचा दशवार्षिक वृध्दीदर १०.५८ टक्के आहे.या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ७४ चौ.कि.मी आहे. आणि जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ८९ टक्के जनता ही ग्रामीण भागात वास्तव्य करतात.
गडचिरोली जिल्हा हा आकारमानाने महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहे
गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४,४१२ चौ.कि.मी. असून गडचिरोली जिल्हा हा आकारमानाने महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४.७ टक्के क्षेत्रफळ गडचिरोली जिल्ह्याने व्यापलेले आहे.जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेनुसार ६ शहरे व १,६७५ गावे असून त्यापैकी १,५०९ गावे लोकवस्ती असलेली व १६६ गावे निर्जन आहेत. सद्यास्थितीत दुर्गम भागापर्यंंत आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मात्र स्थानीक पातळीवर योग्य ती आरोग्य सुविधा मिळत नाही. एकादा गंभीर रूग्ण भरती झाला की त्याला रेफर करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. दुर्गम भागात अद्यापही वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. अनेक ठिकाणी एकच रूग्णवाहीका उपलब्ध आहे. ही रूग्णवाहीका फक्त गरोदर मातांना पुढील उपचारासाठी नेत असते. यामुळे अन्य गंभीर रूग्णास पुढील दवाखाण्यात उपचारासाठी हलवितांना वेळेवर शासकीय रूग्णवाहीका उपलब्ध होत नाही.यामुळे अनेकदा रूग्ण दगावण्याची शक्यता असते.यामुळे जिल्ह्यात १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहीका वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.