Patur :- मागील दोन दिवसांपासून पातूर घाटात चार किलो सोनं आणि सोन्याच्या दागिन्यांसाठी एका महिलेचा मृतदेह टाकल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अफवेमुळे या घाटात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता ही निव्वळ अफवाच असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता कोणताही मृतदेह (Dead body)आढळला नाही.
एका वाहनावर दरोडा टाकून चोरट्यांनी सोनं पळवून नेल्याची अफवा पसरली होती
अफवा अशी पसरली होती की, पातूर घाटातील डोंगराळ भागात चार किलो सोनं (Gold)आणि दागिने घेऊन एका महिलेचा मृतदेह टाकण्यात आला आहे. त्यामुळे सोन्याच्या हव्यासापोटी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर घाटात जमा झाले. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना पिंजण लावावं लागलं. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव आणि परिसरात एका वाहनावर दरोडा टाकून चोरट्यांनी सोनं पळवून नेल्याची अफवा पसरली होती. याच प्रकरणातील सोनं आणि दागिने दरोडेखोरांनी पातूर घाटात लपवून ठेवल्याची चर्चा सुरू होती. ही अफवा आणि महिलेचा मृतदेह टाकल्याची अफवा (rumor) या दोन्ही एकत्र आल्यामुळे पातूर परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलीस निरीक्षक डोपेवाढ, उपनिरीक्षक बंडू मेश्राम, जमादार संबोधी इंगळे, पत्रकार दुलेखा, हामगाडे गाडकर आणि वाहनचालक यांनी घटनास्थळी सखोल तपासणी केली. मात्र तिथे कोणताही मृतदेह किंवा सोन्या-चांदीचे दागिने आढळले नाहीत.