अद्यापही 1 लाख 21 हजार शेतकर्यांनी भरला नाही विमा?
परभणी (Pik Vima Yojana) : जिल्ह्यातील बळीराजा अद्यापही नवीन पिक विमा योजनेतील बदलामुळे हिरमुसला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पिक विमा भरण्याची मुदत संपायला (31 जुलै) अवघा एक दिवस शिल्लक असून, तरीही जिल्ह्यात अजूनही 1 लाख 21 हजार शेतकर्यांनी पिक विमाच भरला नसल्याची माहिती समोर आली आहे.परभणीत तर काही शेतकर्यांच्या वतीने मी पिक विमा भरणार नाही अशी चळवळच चालू केली असल्याचे पहावयास मिळत आहे.
पिक विमा भरण्याकरिता आता केवळ एक दिवस शिल्लक!
राज्य शासनाने (State Govt) 2 वर्ष 1 रुपयात पिक विमा देण्याची योजना सुरू केल्यानंतर, यावर्षी ही योजना बंद करून नव्याने पंतप्रधान पीक विमा योजना आणली. मात्र ज्याकडे शेतकर्यांनी सपशेल पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पीक विमा भरण्याची मुदत संपत आली तरीही 30 जुलै पर्यंत जिल्ह्यात 3 लाख 48 हजार शेतकर्यांपैकी केवळ 2 लाख 15 हजार शेतकर्यांनी 2 लाख 77 हजार दोनशे 58 हेक्टर क्षेत्राचा पिक विमा भरला असून अद्यापही 1 लाख 21 हजार शेतकर्यांनी पिक विमा भरला नसल्याचे पहावयास मिळत आहे. पिक विमा भरण्याकरिता आता केवळ एक दिवस शिल्लक असून, एवढ्या शेतकर्यांचा विमा कसा भरला जाईल. हा प्रश्न उपस्थित होत आहे.
विमा भरण्याची तारीख वाढवावी लागणार का?
जिल्ह्यात अद्यापही 1 लाख 21 हजार शेतकर्यांनी पिक विमा भरला नाही. विमा भरण्यास अवघा 1 दिवस शिल्लक असून, इतक्या शेतकर्यांचा विमा एका दिवसात कसा भरला जाणार? त्यामुळे शासनाकडून (Government) पिक विमा भरण्याकरिता अजून काही दिवसांची मुदत मिळते का? याकडे पाहिल्या जात आहे.
पीक विमा योजनेत चार मोठे बदल, शेतकर्यांची तीव्र नाराजी!
दरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार, शासनाने या योजनेत अनेक बदल केल्याने शेतकर्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. परभणीत तर काही शेतकर्यांनी मी पीक विमा भरणार नाही, अशी चळवळ सुरू केली. आहे. नवीन योजनेत 4 ट्रिगर कमी केले आहेत, ज्यामुळे शेतकर्यांनी (Farmers) पिक विमा भरणे बंद केल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. ज्यामध्ये पावसाभावी पेरणी झाली नाही, तरी विमा मिळण्याची तरतूद होती. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 25 % अग्रीम रक्कम बंद केली. तसेच स्थानिक आपत्ती म्हणजेच उभ्या पिकात (Crops) पावसाने नुकसान झाले, तर पिक विमा मिळत होता. यासह काढणी पश्चात नुकसान म्हणजेच वैयक्तिक नुकसान भरपाई मिळत मिळत होती. हे महत्वाचे मुद्दे यासाठी कारणीभूत ठरले आहे.
2 वर्ष 1 रुपयात विमा भरल्यानंतर, आता एवढा भरावा लागतोय विम्यासाठी प्रीमियम -सोयाबीन 1160 रुपये प्रती हेक्टर, कापुस 1050 रुपये प्रती हेक्टर, तुर 900 रुपये प्रती हेक्टर.