Latur :- दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांच्यावतीने अचानकपणे कोंबिंग व ऑलआऊट ऑपरेशन (All-out operation) करीत गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 110 लॉज तसेच हॉटेलची तपासणी करण्यात आली.
सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्यासाठी ऑलआउट व कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले
याबाबत अधिक माहिती अशी की, दीपावली सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून दीपावली सण शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावे, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वेळीच कारवाई करून त्यांच्याकडून समाजविघातक कृत्य घडू नये याकरिता 17 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अचानकपणे संपूर्ण जिल्ह्यात सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्यासाठी ऑलआउट व कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. यामध्ये लातूर जिल्हा पोलीस दलातील 58 पोलीस अधिकारी तर 212 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ज्यांच्याकडून सण उत्सवाच्या काळात मालाविषयक गुन्हे करण्याची दाट शक्यता असलेल्या गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली असून ऑल आउट व कोंबिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार (criminal) घरी आहेत किंवा नाही, ते सध्या काय काम धंदा करत आहेत, त्यांच्या हालचाली काय आहेत.
दहशत निर्माण करण्यासाठी, अवैधपणे शस्त्रे बाळगणाऱ्या 5 लोकांवर शस्त्र अधिनियमानुसार कार्यवाही
याबाबत त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली. दहशत निर्माण करण्यासाठी, अवैधपणे शस्त्रे बाळगणाऱ्या 5 लोकांवर शस्त्र अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्याला गुन्हे (Crime)दाखल करून शस्त्रे जप्त करण्यात आले आहेत. मालमत्तेविषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरुन बसलेल्या 14 जणांविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 (क) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 73 घरफोडी सारख्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या राहत्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या हालचालींबाबत माहिती घेऊन त्यांना समाजविघातक कृत्य न करण्याबाबत समज देण्यात आली आहे.