करडी पोलिसांचा प्रताप, रेती अभावी घरकुलाचे काम रखडले
मोहाडी येथील पत्रपरिषदेत देवेंद्र लाळे यांचा आरोप
मोहाडी येथील पत्रपरिषदेत देवेंद्र लाळे यांचा आरोप
मोहाडी (Gharkul Yojana) : आमच्या कुटुंबातील युवराज लाळे व मुन्ना लाळे यांना घरकुलासाठी शासनाकडून रेती मिळाली.सदर रेती ट्रॅक्टरमध्ये भरत असतांना करडी पोलिसांनी पकडले. शासनाकडून मिळालेल्या १० ब्रास रेतीचा परवाना दाखवल्यानंतरही पोलिसांनी २० हजार रुपयाची मागणी केली. मात्र पोलिसांना २० हजार दिले नसल्याने खोटा गुन्हा दाखल करीत ट्रॅक्टरसहित रेती जप्त केली. (Gharkul Yojana) सदर प्रकार गावात घडला मात्र गुन्हा नदीपात्रात घडल्याचे दाखविण्यात आल्याचा प्रताप करडी पोलिसांनी केला. जप्त केलेल्या रेतीअभावी दोन्ही भावाच्या घरकुलाचे बांधकाम मात्र रखडले आहे असा आरोप मोहाडी येथे आयोजित पत्रपरिषदेत देवेंद्र लाळे यांनी केला आहे.
मोहाडी तालुक्यातील देव्हाडा (बु.) येथील युवराज लाळे व मुन्ना लाळे या दोन भावांना (Gharkul Yojana) घरकुल बांधकामासाठी शासनाकडून रेती मंजूर झाली. त्याप्रमाणे मुन्ना लाळे यांना एप्रिल २०२५ ह्या महिन्यात तर युवराज लाळे यांना जून २०२५ ह्या महिन्यात रेती मिळाली. घराजवळ जागा नसल्याने व घरकुल बांधकामास काही दिवस विलंब असल्याने दोन्ही भावानी सदर रेती स्वतःच्या मालकीच्या घरालगत शेतात ठेवली. पुढे जुलै २०२५ महिन्यात दोन्ही भावांनी जुने घर पाडून घरकुल बांधकामाला सुरुवात केली. यासाठी घरालगत असलेल्या शेतातील रेती आणणे गरजेचे होते.
लाळे कुटूंबातील देवेंद्र लाळे याच्याकडे ट्रॅक्टर असल्याने त्यास रेती घरी आणण्यास सांगितले गेले.१७ जुलै देवेंद्र लाळे यांनी ट्रॅक्टर क्र.एम.एच.३६/ए.जी.१६५३ मध्ये शेतातील रेती भरण्यास सुरुवात केली. तोच त्याठिकाणी करडी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अरुण कालसर्पे व द्वारकेश्वर मुळे दाखल झाले. पोलिसांनी रेतीबाबत विचारणा केली. सदर रेती युवराज व मुन्ना लाळे यांच्या (Gharkul Yojana) घरकुलाची असल्याचे सांगण्यात आले. शासनाच्या रॉयल्टीच्या पावत्याही पोलिसांना दाखविण्यात आल्या. मात्र पोलिसांनी काही ऐकून न घेता २० हजार रुपयाची मागणी केली.
मात्र देवेंद्र लाळे यांना मागणी मान्य केली नाही. रेती घरकुलाची असल्याचे वारंवार सांगितले. यानंतर करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत त्याठिकाणी आले. ठाणेदारानाही १० ब्रास रेतीची परवाना दाखविण्यात आला. युवराज व मुन्ना लाळे याचे तुटलेले घरही दाखविण्यात आले. त्यावेळी तेथे एकच गर्दी झाली. देव्हाडा (बु) उपसरपंच भाऊराव लाळे व ग्रामसेवक यांनीही ठाणेदार यांना (Gharkul Yojana) घरकुलाची रेती असल्याचे सांगितले. मात्र ठाणेदारानी कुणाचे काही ऐकून न घेता कारवाई करीत देवेंद्र लाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
रेतीसहित ट्रॅक्टरही जप्त करून करडी पोलीस स्टेशनला जमा केले. विशेष म्हणजे सदर प्रकार हा युवराज व मुन्ना लाळे यांच्या घराजवळचा होता. मात्र गुन्हा दाखल करतांना रेती नदीपत्रातील असे दाखविण्यात आले. एफआयआरची कॉपी मागितली ती सुद्धा ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांनी दिली नाही असा आरोप मोहाडी येथे आयोजित पत्रपरिषदेत देव्हाडा (बु.) चे उपसरपंच भाऊराव लाळे, देवेन्द्र लाळे व हेमंत लाळे यांनी केला आहे.
नियमानुसार कारवाई
देवेंद्र लाळे यांचे आरोप खोटे आहेत. देवेंद्र लाळे हा ट्रॅक्टरच्या मदतीने रस्त्यानी रेती वाहून नेत होता. त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पुढील निर्णय न्यायालय देईल. याधीही काही गुन्ह्यात त्याचे नाव आहे. शिवाय कुणीही एफआयआरची प्रत मागितली नाही. ती ऑनलाईन पद्धतीने सहज काढताही येते.
– गोरक्षनाथ नागलोत ठाणेदार, पोलीस स्टेशन, करडी
बांधकाम थांबल्याने घरकुल लाभार्थ्यांची चिंता वाढली
घरकुलासाठी (Gharkul Yojana) मिळालेली रेती घरी जागा नसल्याने आम्ही दुसरीकडे ठेवली होती. ती रेती घराकडे आणण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टरला पोलिसांनी पकडले. घरकुल बांधकामासाठी मिळालेली रेती पोलिसांनी जप्त केली. त्यामुळे रेती अभावी घरकुलाचे बांधकाम कसे होणार याबाबत चिंता वाटते
– युवराज लाळे, घरकुल लाभार्थी, देव्हाडा (बु)