Latur :- नांदेड विभागातील लातूर जिल्ह्य़ात जवळपास १५ नोव्हेंबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू झाला. आतापर्यंत ११ साखर कारखान्यांनी १० लाख ९४०११ मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ९१लाख २६६२ किंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात ६ सहकारी व ५ खासगी असे एकूण ११ साखर कारखान्यांचा २०२४-२५ चा गाळप हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यात भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वच प्रकल्पांत मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे ऊसाचे (Sugarcane) क्षेत्र वाढले आहे.
सर्वच प्रकल्पांत मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध
यंदा जिल्ह्यातील कारखान्यांनी २७०० रुपये च्या प्रमाणे उसाला भाव जाहीर केलेला आहे. जिल्ह्यात सरासरी ८.३४ टक्के साखर उतारा आहे. जिल्ह्यातील ११साखर कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता ३९हजार ४३८ मेट्रिक टन एवढी आहे. १९ डिसेंबर २०२४ पर्यंत कारखान्यांनी ९ लाख १२ हजार ६६२ क्विटल साखरेचे उत्पादन केले आहे. सर्व कारखान्यांचा सरासरी साखर (Sugar) उतारा ८.३४ टक्के आहे. यात सर्वाधिक साखर उतारा जिल्ह्यात विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशाली नगर निवळी ता. जि. लातूर (१०.१५ टक्के) एवढा, तर सर्वात कमी उतारा, शेतकरी सहकारी साखर कारखाना, लि. किल्लारी ता. औसा (३.८४ टक्के) एवढा आहे, असे नांदेड विभागीय साखर सहसंचालक कार्यालयाकडून मिळालेल्या ताज्या अहवालावरून दिसून येत असून सध्या मात्र ऊस गाळप हंगामाला चांगलाच वेग आला आहे.