जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना दिले मागण्यांचे निवेदन!
लातूर (Prohibition Aandolan) : वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट ज्यांच्या विश्वासावर गाठण्यात सरकारला यश आले आज त्याच बँकमित्रांवर आत्महत्येची वेळ आलेली आहे. कष्ट करणाऱ्या बँक मित्रांचे कमिशन (Bank Mitra Commission) खाणाऱ्या मध्यस्थ कंपनीला काढून टाकून आमची नियुक्ती प्रत्यक्ष बँकेकडून करण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी दिनांक 8 ऑगस्ट रोजी बँक मित्रांनी संपूर्ण राज्यभरात काळ्या फिती लावून काम केले. त्याचबरोबर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकाला दिले.
अन्यथा भविष्यात देशव्यापी तीव्र आंदोलन उभे राहील, असा सज्जड इशारा!
‘पूर्वी बँकांमध्ये बँक मित्रांची नियुक्ती जी प्रत्यक्ष बँकेकडून होत होती, ती आता कंत्राटदार कंपन्यांच्या मार्फत होते आहे. नफ्याची माळ जपणाऱ्या बँकांनी पैसे वाचवण्यासाठी बँक मित्रांचे कमिशन जवळपास निम्म्याने कमी केलेले आहे. त्यात भरीस भर म्हणून बँक मित्रांची नेमणूक ही कंत्राटदार कंपनीच्या मार्फत केली जात आहे. ज्यामुळे एखाद्या कामासाठी पूर्वी मिळणाऱ्या कमिशन रूपातील रकमेच्या निम्मी रक्कम सुद्धा बँक मित्रांच्या (Bank Mitra) हातात पडत नाही. एकीकडे वाढती महागाई, वाढत्या जबाबदाऱ्या, वाढत्या भौतिक अपेक्षा व त्याच वेळेला उत्पन्नातील घसरण यामुळे तयार होणाऱ्या आर्थिक ताणतणावातून अनेक बँक मित्र गळफास लावून घेत आहेत. निलेश गणोरकर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. वर्धा जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या तळेगाव शाखेतील निलेश गणोरकर या बँक मित्राने अशाच आर्थिक ताण-तणावातून आपले जीवन संपवले. कष्टकऱ्यांचे हात रिकामी ठेवणारे व कंत्राटदारांची घरं भरणारे हे कंत्राटी प्रारूप तात्काळ रद्द करण्यात यावे व बँक मित्रांची नेमणूक पूर्वीसारखीच प्रत्यक्ष बँकेकडून करण्यात यावी अन्यथा भविष्यात देशव्यापी तीव्र आंदोलन उभे राहील’, असा सज्जड इशारा बँक कर्मचाऱ्यांच्या नेत्या कॉ. रेशमा भवरे यांनी दिला. जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना (Bank Manager) निवेदन दिल्यानंतर त्या बोलत होत्या.
कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी आणखी किती निलेशचा बळी देणार आहात?
राष्ट्रीयकृत बँका भरपूर फायद्यात असताना सुद्धा केवळ खर्च वाचविणे व नफा वाढविणे यासाठी बँकांनी कंत्राटीकरणाचे हे नव भूत घेऊन आल्या आहेत. प्रत्यक्षरीत्या काम करणारे बँक मित्र उपासमारीने मरत असताना कंत्राटदार (Contractor) मात्र मालामाल होत आहेत. त्यामुळे कंत्राटदारांची घरे भरण्यासाठी आणखी किती निलेशचा बळी देणार आहात? असा रोकडा सवाल यावेळी महाराष्ट्र स्टेट बँक (Maharashtra State Bank) मित्राज असोसिएशनचे अंकुश जाधव यांनी केला. यावेळी कॉ. महेश घोडके, महेश यंदे, मारुती आकडे, राघवेंद्र डेबडवार, दत्ता चेवले, फारुक शेख, शिवशंकर पाटील यासह लातूर जिल्ह्यातून 20 ते 30 बँक मित्र उपस्थित होते.




