दिल्लीवरून दोन जण परभणी शहरात दाखल
पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
परभणी (Rahul Gandhi) : संविधान विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे परभणीत सोमवार २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत येणार आहेत. ते ज्या ठिकाणी भेट देणार आहेत, त्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी दिल्लीवरून दोन समन्वयक परभणीत दाखल झाले असून त्यांनी पाहणी पूर्ण केली आहे.
राज्यात गाजत असलेल्या संविधान विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात दररोज अनेक दिग्गजांच्या भेटी परभणीला होत आहेत. कारण या घटनेकडे आता सर्व राजकीय पक्षांची लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मयत सोमनाथच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत जाहीर केली होती, कुटुंबाने ती मदत स्वीकारली नाही. त्यामुळे घटनेला अधिक महत्त्व आले आहे.
या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी चालू आहे. दरम्यान झालेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी राज्यातील अनेक दिग्गज येऊन गेले. आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे सोमवारी परभणीत येत आहेत दुपारी २ वाजेपर्यंत राहुल गांधी परभणीत येणार असून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे लोकनेते कै. विजय वाकोडे यांच्या घरी देखील सांत्वनपर भेट देणार आहेत.
या दोन भेटीच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी दिल्लीवरून बैजू जी व मनोज त्यागी हे दोन समन्वयक परभणीत दाखल झाले आहेत त्यांनी दोन्हीही भेटीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. यावेळी माजी मंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, अँड मुजाहिद खान, नदीम इनामदार आदींची उपस्थिती होती.