बुलढाण्यात २५ फेब्रुला तुपकरांनी बोलावली शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक..
बुलढाणा (Ravikant Tupkar) : शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांची मुलुख मैदानी तोफ पुन्हा एकदा मंगळवारी बुलढाण्यात धडाडणार आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, समस्या आणि त्यासाठीचे आंदोलन या संदर्भात ही बैठक असून रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आता नेमके सरकारवर काय आसूड ओढतात आणि कोणते आंदोलन जाहीर करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान यासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार २५ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील चिखली रोडवर असलेल्या शिवगड हॉटेलमध्ये (जुने गोलांडे लॉन) आयोजित केली आहे. सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे. रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार असून जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते व शेतकरी यांची या बैठकीला उपस्थिती राहणार आहे. पिकविमा व इतर मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच मोठे रंणकंदन केले आहे.
राज्याचे कृषि आयुक्त, कृषी प्रधान सचिव, कृषिमंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन रविकांत तुपकरांनी (Ravikant Tupkar) हा प्रश्न लावून धरला आहे. अद्यापही सरकार या प्रश्नांबाबत सकारात्मक नसल्याने रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान मंगळवारी होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान यासह इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) सरकारवर कोणती तोफ डागतात आणि कोणत्या आंदोलनाची घोषणा करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, त्यामुळे मंगळवारी होणारी बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे.