समाजाभिमुख कार्य करण्याचा प्रयत्न!
लातूर (Ravikant Tupkar) : राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत लातूरच्या मांजरा परिवाराने एक वेगळेपण टिकवले असून परिवाराने कारखानदारी असो की, सहकारी संस्था असो त्यात समाजाभिमुख कार्य करण्याचा प्रयत्न माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून झालेला आहे, असे कौतुक करीत मांजरा साखर परिवाराचा हा आदर्श राज्यांतील साखर कारखानदारांनी (Sugar Millers) घ्यावा, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर यांनी येथे केले.
संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित!
रविवारी तूपकर यांनी लातूर येथे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख यांनी मांजरा साखर परिवारातील साखर उद्योग तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विविध कर्ज योजना, शेतकऱ्यासाठी 5 लाख रुपयांची बिनव्याजी योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम जिल्हा बँकेने केले याबाबत माहिती दिली तसेच उसाला मराठवाडा विभागात सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न मांजरा परिवाराने अग्रेसर असलेला परिवार आहे. शेतकरी हा केंद्रंबिंदू समोर ठेवून कार्य करत असल्याचे सांगून देशात लातूर बँक ही 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जे देणारी पहिली आहे, असे सांगितले. याप्रसंगी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, प्रवक्ते सत्तार पाटील, प्रवक्ते राजेन्द्र मोरे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण मोरे, किसान आर्मीचे श्रीराम चलवाड, सचिन पाटील व क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते (Activists) उपस्थित होते.