मुख्य कार्यकारी अधिकारी, नॅशनल कमोडिटी अँड डेरिवेटिव्हज एक्सचेंज लिमिटेड (NCDEX), मुंबई कडे पाठपुरावा!
रिसोड (Risod Market Committee) : जिल्ह्यातील शेतकरी हितासाठी हळद (Turmeric) पिकाला NCDEX मधील वायदे बाजारातून वगळण्याबाबद रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी हळद पिकाला योग्य दर मिळण्यासाठी पाठपुरावा केला आहे.
गैरव्यवहार पारदर्शक नसतात आणि याचा फटका केवळ सामान्य शेतकऱ्यांना बसतो!
देशातील कृषी क्षेत्राशी संबंधित एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सभापती भुतेकर यांनी एका पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे की, सध्या हळद या पिकाचा समावेश नॅशनल कमोडिटी अँड डेरिवेटिव्हज एक्सचेंज लिमिटेड (NCDEX) च्या वायदा बाजारात (Futures Market) केला जातो. वायदा बाजारामुळे शेतमालाच्या किमतीत स्थिरता येईल आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्ष परिस्थिती याच्या उलट आहे. कारण वायदा बाजारात काही मोठे व्यापारी आणि सट्टेबाज कृत्रिमरित्या हळदीच्या किमतीत वाढ किंवा घट घडवून आणत आहेत. यामुळे प्रत्यक्ष बाजारात (Spot Market) शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. जेव्हा किमती कृत्रिमरित्या वाढतात, तेव्हा शेतकरी चांगल्या दराच्या अपेक्षेने आपला माल रोखून ठेवतात, पण जेव्हा हे भाव अचानक कोसळतात, तेव्हा त्यांना मोठे आर्थिक नुकसान होते. हे गैरव्यवहार पारदर्शक नसतात आणि याचा फटका केवळ सामान्य शेतकऱ्यांना बसतो.
शेतकऱ्याला योग्य भाव मिळण्यास मदत!
या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिरतेवर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, हळद पिकाला NCDEX च्या वायदा बाजारातून वगळणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे किमतीतील कृत्रिम चढ-उतार (Artificial Fluctuations) थांबतील आणि बाजारातील किमतींचा संबंध प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठ्याशी राहील, ज्यामुळे शेतकऱ्याला योग्य भाव मिळण्यास मदत होईल.
कृषी व्यापार व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही परिणाम!
काही अनैतिक घटकांनी एनसीडीएक्सच्या गोदामांमध्ये कमी दर्जाची हळद साठवुन ठेवली आहे आणि तिचा वापर बाजारभावात फेरफार करण्यासाठी केला आहे, अशा काही गंभीर तक्रारीनंतर, एनसीडीएक्सचे अधिकारी तपास करत आहेत, अशा प्रकारची माहीती प्राप्त झाल्याचा सदर पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे. अशा उपक्रमांमुळे केवळ शेतकऱ्यांचे (Farmers) आर्थिक नुकसान होत नाही, तर कृषी व्यापार व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होतो. त्यामुळे आपण या गंभीर विषयावर तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी आणि हळद पिकाला NCDEX मधून वगळून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशा प्रकारची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी नॅशनल कमोडिटी अँड डेरिवेटिव्हज एक्सचेंज लिमिटेड मुंबई यांच्याकडे केली आहे.




