लोकेशनला असलेल्या पंटरला दिला चकवा ; ट्रॅक्टर, केणी जप्त
परभणी/पाथरी (Sand mafia) : गोदावरी नदीपात्रात ट्रॅक्टवर केणीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन, वाहतूक केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यावर कारवाई करण्यात आली. महसूल पथकाच्या लोकेशनवर असलेल्या पंटरला चकवा देण्यासाठी खाजगी वाहनावर लग्न समारंभाचे स्टिकर लावत वर्हाडी बनुन आलेल्या महसुलच्या पथकाने तालुक्यातील उमरा येथे शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी कारवाई केली. उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी शक्कल लढवत या कारवाईत दोन ट्रॅक्टर, दोन केणी असे साहित्य जप्त केले.
तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू (Sand mafia) उपसा होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना मिळाली. त्यांनी विजय भदर्गे, सय्यद साजीद, सचिन साबळे, संदीप बडगुजर या कर्मचार्यांच्या पथकाला सोबत घेतले. शासकीय वाहना ऐवजी खाजगी वाहनाचा वापर करत गोदापात्रात कारवाई केली. दोन ट्रॅक्टर, दोन केणी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील दंडात्मक कारवाईसाठी वाहने ताब्यात घेण्यात आली. १८ फेब्रुवारी रोजी देखील ढालेगाव येथून येणार्या (Sand mafia) वाळुच्या टेम्पोचा पाठलाग करत कारवाई करण्यात आली होती.
कारवाईसाठी लढविली शक्कल
कारवाई टाळण्यासाठी वाळू माफिये अधिकारी, कर्मचार्यांच्या लोकेशनवर राहत आहेत. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी कारवाई करण्यासाठी शक्कल लढवत खाजगी वाहनाचा वापर केला. उमरा येथील कारवाईत (Sand mafia) वाळू माफियांना चकवा देण्यासाठी वाहनावर लग्न समारंभाचे स्टिकर लावले. अचानक नदीकाठी पोहोचत छापा टाकला. अधिकार्यांची शक्कल वाळू माफियांच्या लक्षात न आल्याने कारवाई यशस्वी झाली.