आठवडया भरातील दुसरी घटना
बुलढाणा (Youth Death) : मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील नळगंगा नदीपात्रात बैल धुतांना नदीला अचानक पाणी आल्याने पाण्यात बुडून एका १८ वर्षीय युवकाचा (Youth Death) मृत्यू झाला. सदर घटना आज सोमवार २ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.मृतक युवकाचे नाव महेंद्र राजेश चव्हाण असे आहे.
तालुक्यातील गुळभेली येथील महेंद्र राजेश चव्हाण (वय १८) हा युवक पोळा असल्याने रोहिणखेड मंदीराजवळील नदीपात्रात बैल धुण्यासाठी आपले मित्र गौरव शिवाजी राठोड व गोलू राजू चव्हाण यांच्यासोबत सकाळी ८ वाजेच्या सुमारास गेला होता. नदीत बैल धुतांना नदीला अचानक पाणी आल्याने पाण्यात बुडून महेंद्र चव्हाण याचा मृत्यू झाला. तर ग्रामस्थांनी वेळीच गौरव राठोड व गोलू चव्हाण याला बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. महेंद्र चव्हाण याला जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
गोलू चव्हाण याच्यावर उपचार सुरु आहेत. महेंद्र चव्हाण हा आई-वडिलांचा एकूलता एक होता. शवविच्छेदन करुन दुपारी २.३० वाजेच्या सुमारास महेंद्र चव्हाण याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यापुर्वी २३ ऑगस्ट रोजी रोहिणखेड येथील नळगंगा नदीत बुडून एका २३ वर्षीय युवकाचा मृत्यू (Youth Death) झाला होता.पोळ्याच्या दिवशी सदर घटना घडल्याने गुळभेली गावावर शोककळा पसरली आहे.