डाॅ. हंसराज वैद्य यांची माहिती!
नांदेड (Senior Citizens Association) : उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महाराष्ट्र शासनाचे (Government of Maharashtra) लक्ष वेधण्यासाठी आणि पुढील रणनिती ठरवण्यासाठी एक अति महत्त्वाची बैठक येत्या २४ ऑक्टोबर रोजी, शुक्रवारी सकाळी ठीक ११ वाजता, वैद्य हॉस्पिटस परिसरातील स्व. स्वा. सेनानी डॉ. दादारावजी वैद्य (आर्य) सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही बैठक केवळ ज्येष्ठ नागरिक संघ प्रमुखांची तथा गट प्रमुखांची असणार आहे.
महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांची दखल घेतली नाही!
महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांची दखल घेतली नाही, विधान सभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाची (Bill) नोंद घेतली नाही, तसेच मानधनासह इतर प्रलंबित प्रश्न सामोपचाराने आणि सहानुभूतीपूर्वक हाताळले नाहीत व न्याय दिला नाही तर, ज्येष्ठ नागरिक समूहाचा मतदानावर बहिष्काराचा नेमका पवित्रा काय असावा? पवित्रा कसा असावा? यावर या बैठकीत प्रबोधनात्मक चर्चा होणार आहे.
‘मी ज्येष्ठ नागरिक’चा बिल्ला छातीवर लावून येण्याचे आवाहन!
या बैठकीत ज्येष्ठ नागरिक संघ/गट प्रमुखांना प्रात्यक्षिक देऊन तयार केले जाणार आहे. त्यांना रणनिती अवगत करून दिली जाईल. येताना सर्व प्रमुखांनी ‘मी ज्येष्ठ नागरिक’ चा बिल्ला छातीवर लावून येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे तयार झालेले संघ तथा गट प्रमुख आपापल्या गावी इतर प्रत्येकी पाच-पाच ज्येष्ठ नागरिकांना तयार करणार आहेत. “ठेवाल ज्येष्ठ नागरिकाची ‘पत’! तर नक्की मिळेल त्याचे ‘मत’!!’ आणि “जर कराल ज्येष्ठांशी ‘युती !’ मिळेल विजयाची पावती!!” असा सूचक नारा दिला जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिक मोठा राजकीय पवित्रा घेण्याच्या तयारीत!
या अति महत्त्वाच्या बैठकीला सर्व संघांच्या तथा गटाच्या फक्त कार्यकारिणी सदस्यांनी/प्रमुखांनीच उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य (Dr. Hansraj Vaidya) आणि सचिव प्रभाकर कुंटूरकर यांनी केले आहे. शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या त्वरित मान्य न केल्यास, आगामी निवडणुकांमध्ये (Elections) ज्येष्ठ नागरिक मोठा राजकीय पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट होत आहे.