गोरेगावात कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटात जाण्याचा एकमुखी निर्णय
14 ऑक्टोबरला होणार प्रवेश सोहळा
गोरेगाव (MLA Bhau Patil Goregaonkar ) : माजी आमदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या शिवसेना प्रवेशाला कार्यकर्त्यांनी एकमुखी सहमती दर्शविली आहे. रविवारी या बाबत गोरेगावात कृषि महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी शिवसेना प्रवेशाच्या निर्णयाला सहमती दर्शविली. हिंगोली विधानसभेची निवडणुक भाऊराव पाटील गोरेगावकर (MLA Bhau Patil Goregaonkar) यांनी अपक्ष लढविली होती. तेंव्हापासुन त्यांच्या इतर पक्षात प्रवेशाची सतत चर्चा होत होती.
प्रारंभी भाऊराव पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा झाली होती. काही दिवस चाललेली ही चर्चा पुढे थंड झाली. त्यानंतर त्यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबत चर्चा होऊ लागली. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेल्या नेत्यांनी गोरेगावकरांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला. याला पक्षातील एका आमदारानेही समर्थन दिले. त्यामुळे राष्ट्रवादीतील गोरेगावकरांचा प्रवेशाचा कार्यक्रम बारगळला.
दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. संतोष बांगर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर (MLA Bhau Patil Goregaonkar) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर गोरेगावकरांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली. या बाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी भाऊराव पाटील यांनी रविवारी गोरेगावात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या त्यांच्या निर्णयाला एकमुखी सहमती दिली.
१४ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, संचालक यांच्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले. कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर आपण हा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या बैठकीस व्दारकादास सारडा, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर (MLA Bhau Patil Goregaonkar) , जिल्हा परिषदेचे माजी सभापती भैय्या देशमुख, रंजीत पाटील, प्रल्हादराव शेळके, मदनराव शेळके, सरपंच बालाजी गावंडे, रूपाजी पाटील, माजी सभापती डॉ आर जी कावरखे,दाजीबा पाटील, गजानन क्षीरसागर, सुदर्शन पत संस्थेचे अध्यक्ष गजाननराव पाटील, बाजीराव जुंबडे, द्विज पाटील, वरूण पाटील चंद्रकांत हराळ आदींची उपस्थिती होती.