शेतातून परत येत असताना दुचाकीने दिली धडक!
ताडकळस (Singanapur Accident) : ताडकळस येथील सिंगणापुर रस्त्यावरील गॅस एजन्सी जवळ झालेल्या विचित्र अपघातात शेतातुन काम करुन येणार्या चार मजुर महिलांना एका मोटारसायकलने जोराची धडक दिली. या अपघातात एक महिला ठार तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. दुचाकीस्वारावर नांदेड येथे उपचार सुरु असताना त्याचाही मृत्यू झाल्याची घटना मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात (Tadkalas Police Station) दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीस्वारासह ताडकळस येथील महिलेचा मृत्यू!
ताडकळस पोलिस ठाण्यात शेख मुक्रम शेख शरफोद्दीन यांनी खबर दिली की, सिंगणापुर रस्त्यावरील गॅस एजन्सी जवळ मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एम.एच.२२ बी.जी.१४३९ या क्रमांकाच्या मोटारसायकल चालकाने शेतातील सोयाबीन कापुन घरी परत येणार्या शेख मुमताज शेख अजमोद्दीन, शेख शमिना बी शेख नुर, शेख शमिना शेख हमीद या पायी चालणार्या शेतमजूर महिलांना पाठिमागुन जोराची धडक दिली. या घटनेत सर्व महिलांसह दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला. घटनास्थळी रस्त्यावरून ये-जा करणार्या प्रवाशांनी व आजुबाजुच्या शेतकर्यांनी धाव घेऊन जखमींना तात्काळ दवाखान्यात दाखल केले. परंतु यामध्ये जखमी झालेल्या शेख शमिना बी शेख नुर यांना तपासणी करून डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी महिलांना खाजगी दवाखान्यात दाखल केले. दुचाकीचालक गौतम लिंबाजी मस्के रा. पांढरी ता.जि. परभणी वय ४१ वर्षे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला परभणी येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा ही रात्री १२ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गजानन मोरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे,बिट जमादार पोउपनि नामदेव सुजलोड हे करीत आहेत.